सकाळी निसटला सायंकाळी सापडला
By Admin | Updated: July 12, 2015 22:55 IST2015-07-12T22:55:51+5:302015-07-12T22:55:51+5:30
पोलिसांची झोप उडविणारा चोरटा अखेर जेरबंद

सकाळी निसटला सायंकाळी सापडला
कुडाळ : कुडाळात गेल्या पंधरा दिवसांत पोलिसांसह नागरिकांची झोप उडवून देणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. रविवारी सकाळी पोलिसांच्या हातून निसटला, पण सायंकाळी सुकळवाड रेल्वे ट्रॅकजवळ सापडला. कुडाळ पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलीस अधीक्षकांसमोर हजर करण्यासाठी त्याला ओरोस येथे नेण्यात आले आहे. पोलिसांनी त्याचे नाव गुप्त ठेवले असून, तो उत्तर प्रदेशमधील असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, या चोरट्याला पकडण्यासाठी कुडाळ पोलिसांनी बारा तास पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
कुडाळ तालुक्यात पंधरा दिवसांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तब्बल पंधरा ते वीस बंद घरांसह शाळा, बँका, मंदिरे चोरट्यांनी लक्ष्य केली होती. त्यामुळे पोलीस चांगलेच हतबल झाले होते. शनिवारी मध्यरात्री कुडाळ येथे १२ बंद फ्लॅट फोडले. तसेच पिंगुळी येथे एक घरही या चोरट्यांनी फोडले. त्यामुळे पोलीस चांगलेच हैराण झाले होते. सर्वत्र नाकाबंदी असताना या नाकाबंदीला छेद देत चोरटे चोरी करीत असल्याने पोलीसही गोंधळून जात असत. त्यामुळे पोलीस रात्री बरोबरच दिवसाही नाकाबंदी करून शहरात नवीन येणाऱ्या युवकांसह तरुणांची चौकशी करीत असत.
रविवारी सकाळी पोलीस हेडकॉन्स्टेबल साळस्कर हे आपली ड्युटी संंपवून जात असताना त्यांना मुुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस वेताळबांबर्डे(पान १ वरून) येथे एक २२ ते २३ वर्षीय युवक संशयास्पदरीत्या महामार्गाच्या कडेने चालत असलेला दिसला. त्यांनी तेथीलच एका हॉटेल व्यावसायिकाला त्या युवकाला चौकशीसाठी बोलावूया, असे सांगितले. युवक हॉटेलच्या जवळ आल्यानंतर पोलीस आणि हॉटेलच्या मालकाने त्याला बोलावून त्याची विचारपूस केली; परंतु युवक उत्तर प्रदेशातील भाषा बोलत असल्याने साळस्कर यांनी त्याच्याकडील बॅग घेतली. या बॅगेत कटावणी, स्क्रू डायव्हर, मोबाईल, विजेरी, विविध प्रकारच्या पकडी, सोन्याचे खोटे दागिने व चांदीचे दागिने आणि ६१९ रुपयांची नाणी मिळाली. परंतु बॅग उघडताच युवक पोलीस आणि हॉटेलमालकाला गुंगारा देत वेताळबांबर्डेच्या दिशेने पसार झाला.
चोरटा वेताळबांबर्डे मुस्लिमवाडीच्या दिशेने पळाल्याचे समजताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी तेथेही जाऊन पाहिले; परंतु तो वेताळबांबर्डेच्या जंंगलमय भागात पळून गेल्याने हाती लागला नाही.
तीन पथकांकडून शोधकार्य
चोरट्याला पकडण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची तीन पथके तत्काळ वेताळबांबर्डे येथे दाखल झाली. ही पथके दिवसभर नजीकच्या जंगल परिसरात चोरट्याचा शोध घेत होती. यामध्ये वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी, बांदा, ओरोस येथील सुमारे ६० पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा बारा तास शोध घेत होते.
चोरट्याच्या बॅगमध्ये आढळलेल्या त्याच्या रुमालाच्या वासावर श्वानपथकातील श्वान वेताळबांबर्डेच्या जंगलमय भागाच्या दिशेने पळाला. मात्र, तिथेच घुटमळला. (प्रतिनिधी)
सुकळवाडजवळ पाठलाग करून पकडले
सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्याला हा चोरटा सुकळवाड ते तळगाव येथील रेल्वेट्रॅकच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्रे त्या दिशेने फिरवून सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कुडाळ रेल्वेस्थानकाच्या दिशेने येताना दिसला .पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. कुडाळचे पोलीस पी. जी. मोरे व आर. एस. सुर्वे यांनी पाठलाग करून त्याला पकडले.