काम करण्यासाठी ‘सत्ता’ नव्हे ‘इच्छाशक्ती’ लागते
By Admin | Updated: September 11, 2015 23:25 IST2015-09-11T22:05:34+5:302015-09-11T23:25:33+5:30
नितेश राणे : तिरवडे तर्फ खारेपाटण ग्रामसचिवालयाचे उद्घाटन

काम करण्यासाठी ‘सत्ता’ नव्हे ‘इच्छाशक्ती’ लागते
वैभववाडी : जनतेची कामे करण्यासाठी सत्ता नव्हे तर इच्छाशक्ती असावी लागते. ती आमच्यामध्ये आहे. त्यामुळे सत्तेत नसलो तरी विकास कामात खंड पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी तिरवडे तर्फ खारेपाटण येथील ग्रामसचिवालयाच्या उद्घाटन समारंभात केले.तिरवडे तर्फ खारेपाटण येथील ग्रामसचिवालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, सभापती वैशाली रावराणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रणीता पाताडे, उपसभापती शोभा पांचाळ, जिल्हा परिषद सदस्य धोंडूशेठ पवार, नायब तहसीलदार निर्मला तळेकर, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, शुभांगी पवार, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, सीमा नानिवडेकर, सरपंच स्नेहल पाथरे आदी उपस्थित होते.आमदार राणे म्हणाले, आधीच्या आमदारांनी सत्तेत नसल्याचे टुमणं नाचवत पाच वर्षे केवळ आश्वासने दिली. आता केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनसुद्धा ते निधी आणू शकत नाहीत. अशी टीका त्यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर केली. तर सत्तेत नसताना सुद्धा आम्ही विकासाला गती देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, ग्रामसचिवालय हे गावाच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे येथील कारभार लोकाभिमुख असला पाहिजे. मी तळागाळातील समस्या सोडविण्यास प्राधान्य देणारा आमदार आहे. मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबाचा घटक आहे. त्यामुळे माझ्याकडे कोणतेही काम घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा आपण अपेक्षाभंग होऊ देणार नाही. तुमचा हक्काचा आमदार म्हणून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविणे ही माझी जबाबदारी आहे, असे नितेश राणे यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)