पशु-पक्षी पालनातून आर्थिक उन्नतीचा व्यवसाय करणे शक्य
By Admin | Updated: March 26, 2015 00:08 IST2015-03-25T22:26:19+5:302015-03-26T00:08:54+5:30
जिल्हास्तरीय मेळावा : भाट्येत जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे कार्यक्रम

पशु-पक्षी पालनातून आर्थिक उन्नतीचा व्यवसाय करणे शक्य
रत्नागिरी : पशु-पक्षी पालन हा आर्थिक उन्नतीचा चांगला व्यवसाय असल्याचा सूर जिल्हास्तरीय पशु-पक्षी व पशुपालक मेळाव्यातून उपस्थितांच्या मार्गदर्शनातून निघाला. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने भाट्ये येथे आज बुधवारी येथे हा जिल्हा स्तरिय पशु-पक्षी व पशुपालक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्याहस्ते तर उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा कृषी विकास अधिकारी बी. एन. देशमुख, उपविभागिय कृषी अधिकारी आरिफ शहा, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, उपसभापती योगेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या शीतल हर्डीकर, विनय गावडे, सदस्य नंदकुमार मोहिते, वारणा दुध सहकारी संघाचे जनरल मॅनेजर डॉ. दिलीप खोत, डॉ. अभिजित कसालकर उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राजापकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्हा शेती प्रधान आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका ठेवली, तर प्रत्येक योजना शेतकऱ्यांच्या घरोघरी पोहोचू शकते. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे अवश्यक आहे. जिल्ह्याला दररोज दीड लाख लिटर्स दुधाची आवश्यकता लागते. मात्र, उत्पादन केवळ ४१ हजार लिटर्स आहे. उर्वरित अवश्यक असलेले एक लाख लिटर्स दूध इतर जिल्ह्यातून आणावे लागते, अशी खंत राजापकर यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, मुंबई सर्वसामान्यांची राहिलेली नाही. त्यासाठी प्रवास उलटा करायला पाहिजे. मुंबईहून आता शेताकडे यायला पाहिजेत. येथे मुबलक पाणी असून शेती केल्यास शेतकरी सधन होऊ शकतो. त्यासाठी आमचे शासन आणि शेतकरी यांनी हातात हात घालून काम केले तरच शेतकरी सुलजाम् सुफलाम् होईल. शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, इतिहासाचा मूळ साक्षीदार पशु आहे. शेती हे उत्पन्नाचे साधन असले तरी त्याला पशुपालन हा पुरक व्यवसाय आहे. त्यासाठी पशुपालन वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वारणा दूध सहकारी संघाचे जनरल मॅनेजर डॉ. दिलीप खोत यांनी दिवसेंदिवस दुधाची आवश्यकता वाढत असल्याचे सांगतानाच बाजारात कृत्रिमरित्या तयार केलेले दूध विकले जात असून त्याला दूध म्हणता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुग्ध संघांना दूध दिल्यास जास्त दर मिळू शकतो. दुध व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल आहे. तसेच हा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. त्यासाठी तीन बाबींकडे लक्ष ठेवणे अवश्यक आहे. त्यामध्ये जनावरांच्या आहाराची काळजी, त्यांचे बाळंतपण आणि योग्य व्यवस्थापन यांचा समावेश आहे. दुग्ध व्यवसाय हा हमीभाव असणारा व्यवसाय असून त्यामध्ये जास्तीत जास्त पशुपालकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आदर्श पशुपालक, अध्यक्ष- कामधेनू दत्तकग्राम योजना तसेच उत्कृष्ठ पशुधन धारकांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. (शहर वार्ताहर)