‘पंचम खेमराज’मधील नोकरभरती वादात

By Admin | Updated: August 23, 2015 23:29 IST2015-08-23T23:28:38+5:302015-08-23T23:29:37+5:30

बनावट कागदपत्रे : तत्कालीन सचिवासह अन्य एकावर गुन्हा दाखल

In the issue of recruitment of 'Pancham Khemraj' | ‘पंचम खेमराज’मधील नोकरभरती वादात

‘पंचम खेमराज’मधील नोकरभरती वादात

सावंतवाडी : येथील पंचम खेमराज महाविद्यालयात कर्मचारी भरती करताना कार्यकारी मंडळासह नियामक मंडळाला विश्वासात न घेता बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती करण्यात आल्याचा ठपका ठेवत दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे तत्कालीन सचिव मोहन दत्ताराम देसाई (रा. कळणे, ता. दोडामार्ग) व प्रदीप उत्तम देसाई (रा. बांदा, ता. सावंतवाडी) या दोघांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन सचिवांच्या काळात झालेली नोकरभरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सावंतवाडीतील पंचम खेमराज हे महाविद्यालय आहे. संस्थेचे तत्कालीन सचिव मोहन देसाई यांनी संगनमत करून १३ जुलै २०१३ रोजी पंचम खेमराज महाविद्यालयात कर्मचारी भरती करताना संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच कार्यकारी मंडळ व नियामक मंडळ यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता तसेच रितसर मुलाखती न घेता भरती केली होती. यामध्ये तीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या भरतीची जाहिरातही एका वृत्तपत्रात दिली होती. त्याची माहितीही संस्थेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांना दिली नाही. ही भरती करताना बांदा खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलचे शिक्षक प्रदीप देसाई यांनीही मोहन देसाई याला मदत केली आहे.
हा सर्व प्रकार काही दिवसांपूर्वी सध्याच्या कार्यकारी मंडळाच्या लक्षात आला. त्यानंतर शनिवारी याबाबत सध्याचे संस्था सचिव सुरेश जयसिंग भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मोहन देसाई व प्रदीप देसाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन सचिव मोहन देसाई व नियामक मंडळात वाद झाला होता.
या वादानंतर नवीन नियामक मंडळात देसाई यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे सध्याच्या नियामक मंडळ व मोहन देसाई यांच्यातील वाद अद्यापही धुमसत आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही संस्था सचिव यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप आम्हाला या गुन्ह्याकामी कागदपत्रे गोळा करायची आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्याची भरती केली होती, त्यांचे जबाबही नोंदवयाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: In the issue of recruitment of 'Pancham Khemraj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.