ईशानी पाटणकर ‘लिटील व्हॉईस आॅफ रत्नागिरी’
By Admin | Updated: January 9, 2015 00:10 IST2015-01-08T23:25:40+5:302015-01-09T00:10:33+5:30
रत्नागिरीकरांची गर्दी : कोसंबी, भिडेंच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

ईशानी पाटणकर ‘लिटील व्हॉईस आॅफ रत्नागिरी’
रत्नागिरी : आकर्षक रंगमंच, नेत्रदीपक लाईट इफेक्टस्, उत्तम दर्जाची उदयराज सावंत यांची साऊंड सिस्टिम आणि वादक कलाकारांच्या समर्पक साथसंगतीने सजलेल्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीची ईशानी पाटणकर ठरली ‘लिटील व्हॉईस आॅफ रत्नागिरी’. या रंगारंग स्पर्धेला रत्नागिरीकर रसिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भरभरुन गर्दी केली होती. संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या उपस्थितीने तसेच प्रसिद्ध गायक प्रसेनजीत कोसंबी आणि कोकणकन्या शमिका भिडे यांच्या गायनाने या स्पर्धेची सांगता झाली.स्पर्धेत संगमेश्वरच्या गौतमी वाडकर हिने द्वितीय, तर देवरुखच्या सिद्धी शितूतने तृतीय क्रमांक पटकावला. प्राथमिक फेरीतून ११ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. ‘मराठी आणि हिंदी’ अशा दोन फेऱ्या झाल्यानंतर ईशानी पाटणकर, गौतमी वाडकर, सिद्धी शितूत, अनुष्का देवरुखकर, राधिका भिडे, विशारद गुरव या ‘टॉप-६’ची शेवटच्या फेरीसाठी निवड झाली. त्यानंतर झालेल्या एका फेरीतून या तीन विजेत्यांची निवड परीक्षक कमलेश भडकमकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांनी केली. ‘ओम ग्रुप’चे संयोजक अभिजीत गोडबोले यांनी या स्पर्धेची आखणी केली होती.
स्पर्धकांना सिंथेसायझरसाथ राजू किल्लेकर, तबला - कोंगो साथ पांडुरंग बर्वे, ढोलक - ढोलकीसाथ केदार लिंगायत आणि आॅक्टोपॅडसाथ शिवा पाटणकर यांनी केली.
पहिल्या फेरीपासूनच या स्पर्धेची रंगत वाढत गेली. प्रत्येक स्पर्धकाने उत्तमोत्तम गीते सादर करत रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. अशा प्रकारे रत्नागिरीत सादर झालेली ही पहिलीच स्पर्धा ठरली. त्यामुळे प्रतिवर्षी या स्पर्धेचे आयोजन ‘ओम ग्रुप’ आणि ‘दिल से क्रिएशन्स’ या ग्रुपने करावे, अशी मागणी प्रेक्षकांतून करण्यात आली. स्पर्धेच्या मध्यंतरात गायक प्रसेनजीत कोसंबी आणि शमिका भिडे यांच्या गाण्यांनी धमाल आणली. या स्पर्धेत स्पर्धकांची ओळख छायाचित्रकार परेश राजीवले यांनी छायाचित्रण करुन दृकश्राव्य माध्यमातून स्क्रिनवर दाखविली. तसेच नीलेश नांदगावकर यांनी रंगमंच सजावट केली. रत्नागिरीत असा उपक्रम बालकलाकारांसाठी घेतल्याबद्दल ‘ओम ग्रुप’ आणि ‘दिल से’ ग्रुपचे कौतुक केले. प्रत्येक शहरात ग्रुपची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)