‘त्या’ उमेदवारांना तत्काळ सेवेत सामावून घ्या

By Admin | Updated: January 7, 2015 23:55 IST2015-01-07T22:39:06+5:302015-01-07T23:55:35+5:30

चेतन हसबनीस : कणकवलीत एस. टी.च्या सेवानिवृत्त संघटनेची बैठक

Involve those candidates for immediate service | ‘त्या’ उमेदवारांना तत्काळ सेवेत सामावून घ्या

‘त्या’ उमेदवारांना तत्काळ सेवेत सामावून घ्या

कणकवली : एसटी महामंडळामध्ये चालकांच्या भरतीसाठी परीक्षा घेऊन प्रतीक्षासूची तयार करण्यात आली आहे. या प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र एसटी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची बैठक येथील एसटी विभागीय कार्यशाळेनजिक असलेल्या गणेशमंदिरात नुकतीच झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बी. डी. तावडे, कार्याध्यक्ष विश्वनाथ दळवी, ए. एन. महाडिक, संघटक सचिव जी. के. दळवी, शिवराम सावंत, शांताराम पाताडे, शंकर गोसावी, शरद कदम, दत्ताराम बागवे, सुभाष राणे, अच्युत गावडे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांची भेट घेण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
ज्या मार्गावर एसटीच्या साध्या गाड्या धावतात, त्या मार्गावर निमआराम गाड्या चालवून एसटी महामंडळाकडून प्रवाशांना विनाकारण आर्थिक भुर्दंडात टाकले जात आहे. हे तत्काळ बंद करा. वाहन परीक्षक आपल्या मर्जीप्रमाणे गाड्या मार्गावर चालविण्यासाठी देत आहेत. याबाबतही विभाग नियंत्रकांचे लक्ष वेधण्यात आले. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. चालकांची पदे भरण्यासाठी परीक्षा घेऊन प्रतीक्षा सूची तयार करण्यात आली आहे. मात्र या प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांना एसटी सेवेत कधी सामावून घेणार? असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्यात येतील, असे आश्वासन विभाग नियंत्रकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. (वार्ताहर)

Web Title: Involve those candidates for immediate service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.