वळणावरची ती भिंत देतेय अपघाताला निमंत्रण
By Admin | Updated: November 5, 2014 00:05 IST2014-11-04T21:50:54+5:302014-11-05T00:05:55+5:30
संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब

वळणावरची ती भिंत देतेय अपघाताला निमंत्रण
देवरुख : मुंबई - गोवा महामार्गावरील अतिक्रमणांना धोबीघाट दाखवणाऱ्या बांधकाम विभागाने स्वत: बांधलेली संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब लावला आहे. ही भिंत अपघाताला कारणीभूत ठरत असून, बांधकाम विभागाने ती तातडीने हटवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. १७वर संगमेश्वरजवळ असलेले शासकीय विश्रामगृह १०० वर्षांचे झाले आहे. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमासमोरच विश्रामगृह आहे. येथे फार पूर्वी काळ्या दगडांचा वापर करून संरक्षक भिंंत उभारण्यात आली आहे. पूर्वी या महामार्गावरची वाहतूक मर्यादित होती. त्यावेळी या भिंतीचा अडसर जाणवला नाही. आता मात्र महामार्गावरची वाहतूक वाढल्याने या भिंतीचा मोठा त्रास दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या भिंतीलाच लागून धोकादायक आणि अरुंद वळण आहे. भिंत महामार्गाला टेकल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी बाजूपट्टीही शिल्लक राहिलेली नाही. संगमेश्वरकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नाही. रत्नागिरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनचालकांना समोरुन एखादे वाहन आल्यास आपल्या वाहनावर ताबा मिळवणे कठीण जाते. यामुळे आजवर अनेक अवजड वाहने थेट नदीत कोसळली आहेत. आजवर येथे झालेल्या अनेक अपघातात सहा जणांना प्राण गमवावे लागले असून, १५पेक्षा अधिक प्रवासी जायबंदी झाले आहेत. मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी वाहने शासकीय विश्रामगृहाजवळील या धोकादायक भिंंतीजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला ओढली जात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांवर आपटूनही येथे अनेक अपघात घडले आहेत. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे पादचारी आणि वाहनचालकांनी ही भिंंत तातडीने हटविण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र, या मागणीकडे लक्ष द्यायला बांधकाम विभागाला वेळ नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ही भिंंत हटवायची नसेल तर नदीच्या बाजूने काँक्रीटची संरक्षक भिंंत उभारून वळण रुंद करणे शक्य असतानाही बांधकाम विभाग दोन्ही गोष्टींचा विचारच करत नसल्याने याठिकाणी घडणाऱ्या अपघातांचा धोका कायम राहिला आहे. (प्रतिनिधी)