सिंधुदुर्गनगरी : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२५’ ३० एप्रिल रोजी सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.या परिषदेत ३० सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. या करारातून २५३.०२ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली आहे. या माध्यमातून ८४० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आणखी काही उद्योजक या परिषदेत सहभाग घेण्यास इच्छुक असतील तर त्यांनाही सहभागी करून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या दालनात गुंतवणूक परिषद २०२५ संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा समन्वयक श्रीपाद दामले, रवींद्र पत्की आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले की, ३० एप्रिल रोजी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत ३० उद्योजकांमध्ये सामंजस्य करार केला जाणार आहे. या करारातून २५३.०२ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली आहे. या माध्यमातून ८४० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. १२ मार्च रोजी विभागीय गुंतवणूक परिषदेत ४३ सामंजस्य करार करण्यात आले. यात ३८२.९१ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली आहे.
सन २०२४ मध्ये ९१ करार, ६४ उद्योग सुरूसन २०२४ मध्ये गुंतवणूक परिषदेअंतर्गत ९१ करार करण्यात आले होते. यात ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक होती, तर ११६७ जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातील ६४ उद्योग सुरू होण्याच्या मार्गावर आहे. यात ५५ सुरू झाले आहेत, उर्वरित सुरू होतील. १४ उद्योजकांनी जमिनी ताब्यात घेतल्या आहेत, तर चारजणांनी करार रद्द करण्याबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
सन २०२५ मध्ये ७३ करार, ६३५.९३ कोटींची गुंतवणूकगुंतवणूक परिषद २०२५ मध्ये विभागीय गुंतवणूक परिषदेत ४० उद्योजकांनी करार केला असून, यात ३८२.९१ कोटींची गुंतवणूक केली आहे. यातून ८७२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, तर जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ३० करार केले जाणार असून, यात २५३.०२ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून ८४० लोकांना रोजगार मिळेल. यावर्षी ७३ करार होणार असून, ६३५.९३ कोटींची गुंतवणूक होणार आहे.