धामापुरात रोखली अवैध वाळू वाहतूक
By Admin | Updated: February 2, 2015 00:02 IST2015-02-01T23:06:36+5:302015-02-02T00:02:48+5:30
ग्रामस्थ आक्रमक : धुळीच्या त्रासाला कंटाळून कृती; रात्रीचासुद्धा खडा पहारा

धामापुरात रोखली अवैध वाळू वाहतूक
चौके : मालवण तालुक्यातील धामापूर बौद्धवाडीतील महिला व ग्रामस्थांनी भरधावपणे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे रस्त्यावरील धुळीचा त्रास झाल्यामुळे तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या प्राथमिक शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून डंपर चालकांविरोधात आक्रमक होत या मार्गावरील डंपर वाहतूक रोखली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धामापूर येथे वाळू उत्खनन सुरु असून त्याची वाहतूक करण्यासाठी या मार्गावरून डंपरची वाहतूक सुरु असते. त्यात करून सध्या वाळू व्यवसाय अनधिकृतपणे सुरु असल्याने बहुतांशी रात्रीची वाहतूक सुरु असते. परंतु धामापुरातील हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे ज्यावेळी या रस्त्यावरून एखादा डंपर भरवेगात जातो त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व घरांमध्ये तसेच सार्वजनिक विहीर, समाजमंदिर आणि प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. असे ७० ते ८० डंपर दिवसाला या मार्गावरून वाळू वाहतूक करतात, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे घरात राहणे मुश्किल झाले आहे. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज शाळा धुवून काढावी लागते. त्यानंतर शाळेतील वर्ग बसण्यायोग्य होतात.
परंतु धामापुरातील काही स्थानिक तरुण या व्यवसायातून रोजगार मिळवितात. म्हणून दररोज रस्त्यावर पाणी मारून डंपर वाहतूक करण्यास बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी परवानगी दिली होती. परंतु तसे होत नसल्यामुळे ग्रामस्थांना धुळीचा त्रास सहन करावा लागला. शेवटी आक्रमक होऊन वाडीतील महिलांनी हे पाऊल उचलले असे यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले.
वाळू वाहतूक करणारे डंपर हे नेहमी भरधाव वेगात असतात. त्यामुळे या मार्गावरून पायी चालणाऱ्या तसेच दुचाकीस्वारांना नेहमी जीव मुठीत धरूनच चालावे लागते. तसेच बौद्धवाडीतील लोक ज्या सार्वजनिक विहिरीचे पाणी पितात ती विहीर रस्त्याच्या कडेला असून डंपर वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे विहिरीचे पाणीही दूषित होत असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. बहुतांश वेळा रात्रीची डंपरमधून वाळू वाहतूक होत असल्याने परिसरातील घरांमधील लहान मुले डंपरच्या आवाजामुळे दचकून जागी होतात. त्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हा धोकाही महिलांनी बोलून दाखविला.
म्हणूनच गेले दोन दिवस आणि रात्रीसुद्धा या मार्गावरील डंपर वाहतूक महिलांनी अडविली. यावेळी वाडीतील महिला सुवर्णा नाईक, संपदा धामापूरकर, विनया जाधव, नीलम नाईक, दीपिका जाधव, सिताबाई जाधव, जयश्री जाधव, अशोक थवी, सत्यवान थवी, उल्हास थवी, जगन्नाथ नाईक, आनंद नाईक, रोहिणी नाईक, रामचंद्र जाधव तसेच इतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)