माविमच्या ‘तेजस्विनी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

By Admin | Updated: October 30, 2015 23:39 IST2015-10-30T22:18:32+5:302015-10-30T23:39:32+5:30

कार्याचा गौरव : २० देशांतील ५६ प्रकल्पांमधून निवड; समानता विषयाला अनुसरून पसंती

International award for 'Tejaswini' from Mawim | माविमच्या ‘तेजस्विनी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

माविमच्या ‘तेजस्विनी’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

रत्नागिरी : बचत गटाच्या माध्यमांतून राज्यभर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच त्यांच्या सर्वंकष विकासासाठी कार्यरत असलेल्या, महाराष्ट्र शासनाची महिला विकासाची राज्यस्तरीय शिखर संस्था असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाला अर्थात ‘माविम’ला आंतरराष्ट्रीय आयफॅड संस्थेचा ‘समानता पुरस्कार २०१५’ घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हा समन्वयक दीपक भागवत यांनी ‘लोकमत’ला दिली.
२० देशातील ५६ प्रकल्पांमधून माविमच्या ‘तेजस्विनी’ प्रकल्पाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आयफॅड ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे.
दारिद्र्यनिर्मुलन, कृषी विकास व महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेमार्फत ९९ देशांमध्ये १८५ प्रकल्प सुरू आहेत. यावर्षी या संस्थेने एशिया पॅसिफिक या विभागातून हा पुरस्कार जाहीर केला होता. हा पुरस्कार ‘समानता’ या विषयावर सातत्यपूर्ण काम करणाऱ्या प्रकल्पाला देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार माविमने केलेल्या भरीव कार्याची दखल घेत हा पुरस्कार देऊ केला आहे. या नामनिर्देशनासाठी माविमच्या तेजस्विनी कार्यक्रमाची निवड करण्यात आली आहे, असे दीपक भागवत यांनी सांगितले.
माविम सहायत तेजस्विनी या कार्यक्रमाची अंमलबजावणी गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील ३३ ग्रामीण जिल्ह्यांमध्ये करीत आहे. या वाटचालीत माविम जिल्हा यंत्रणा, लोकसंचालित साधन केंद्राची संपूर्ण कार्यकारिणी, स्वयंसहाय बचत गटातील महिला सभासद, सर्व लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, लेखापाल व सहयोगिनी यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
मुंबई मुख्यालय माविमच्या उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक कुसुम बाळसराफ यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे माविमच्या चळवळीला अधिकच प्रेरणा मिळाली असल्याचे दीपक भागवत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


बचत गटाच्या माध्यमातून राज्यभर महिलांसाठी कार्यरत.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच सर्वंकष विकासासाठी कार्यरत.
आयफॅड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून पुरस्काराची घोषणा.
एशिया पॅसिफिक विभागातून पुरस्कार जाहीर.

Web Title: International award for 'Tejaswini' from Mawim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.