व्याजासह रक्कम देण्याचे आदेश
By Admin | Updated: November 22, 2014 00:11 IST2014-11-21T22:40:55+5:302014-11-22T00:11:33+5:30
बिल्डरला दणका : जिल्हा ग्राहक मंचाचा न्यायनिवाडा

व्याजासह रक्कम देण्याचे आदेश
सिंधुदुर्गनगरी : बिल्डरने आगाऊ रक्कम घेऊन तसेच नोटरीद्वारे करार करूनही फ्लॅटचा ताबा किंवा रक्कम परत केली नाही म्हणून जिझझ रिअर इस्टेट सावंतवाडी यांच्याविरूद्ध फ्लॅटच्या खरेदीपोटी स्वीकारलेली रक्कम १ लाख २५ हजार ही २१ आॅगस्ट २००८ पासून दसादशे १० टक्के व्याजदराने पूर्ण वसूल होईपर्यंतच्या दिवसापर्यंत द्यावे. तसेच (फ्लॅटधारक) तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी २५ हजार रुपये व तक्रार खर्चापोटी ५ हजार रुपये द्यावेत असे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक मंचाचे प्रभारी अध्यक्ष कमलाकांत कुबल यांनी दिले.
सावंतवाडी येथील जॉन एडवर्ड लोबो यांनी जिझझ रिअर इस्टेटतर्फे प्रोप्रा. लुईजा कार्मा ट्राव्हासो व नॉर्मन मॉर्गन ट्राव्हासो गोवा यांच्याकडून २१ मे २००८ रोजी रजिस्टर साठे करार करून ‘डॉमनिक मेन्सन’ नावाच्या बिल्डींगमध्ये पहिल्या मजल्यावरील ५५० चौरस फूट असलेला फ्लॅट ४ लाख रुपये किंमतीला खरेदी करण्याचा ठरविला. मात्र विविध मुदतीत फ्लॅटचा ताबा जॉन लोबो यांना न देता त्रयस्थ व्यक्तीस तो विकण्यात आला.
याबाबतची नोटीस पाठवून लोबो यांना करार संपुष्टात आल्याचे कळविले. मात्र, हे करताना त्याच दरम्यान तक्रारदाराने दिलेले पैसे स्वीकारले. त्यामुळे करार संपुष्टात आलेला नसल्याचा युक्तीवाद तक्रारदाराच्या विधिज्ञांनी केला. तो ग्राह्य धरून ग्राहक मंचाचे फ्लॅटच्या खरेदीसाठी स्वीकारलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे तसेच त्रासापोटी २५ हजार व खर्चापोटी ५ हजार रुपये तक्रारदारास देण्याचे आदेश दिले. ग्राहक मंचाने बिल्डरविरूद्ध आदेश देताना म्हटले आहे की, तक्रारदाराने बुकींग केलेल्या फ्लॅटचे बांधकाम अपूर्ण ठेवून दुसऱ्या ग्राहकास फ्लॅटची विक्री करणे चुकीचे आहे.
अशा पद्धतीने अनेकांकडून एकाच फ्लॅटसाठी बुकींगची आगाऊ रक्कम स्वीकारणे हा अनुचित व्यापारी पद्धतीचा प्रकार आहे आणि अशी पद्धत बांधकाम व्यवसायात रूढ झाली तर सर्वसामान्य ग्राहक तथा फ्लॅटधारक त्यामध्ये भरडला जावू शकतो. त्याला न्यायाद्वारे पायबंद घालणे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार क्रमप्राप्त आहे. तक्रारदार जॉन लोबो यांच्यावतीने विधीज्ञ म्हणून अश्विनी वेंगुर्लेकर यांनी काम
पाहिले. (प्रतिनिधी)