मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अटकाव
By Admin | Updated: July 10, 2014 00:28 IST2014-07-10T00:25:32+5:302014-07-10T00:28:58+5:30
रेडी सरपंचांसह बाराजण ताब्यात : कोणतीही कारवाई न करताच सोडले, जमीनदारांची कारवाईबाबत तक्रार

मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अटकाव
वेंगुर्ले : कनयाळ येथे होणारा तेरेखोल ते रेडी बंदर रस्त्याची मोजणी करण्यास आलेल्या प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षण, तलाठी, भूमिअभिलेख अधिकारी यांना कनयाळ येथील जमीन मालकांनी जाब विचारल्याने रेडी सरपंच सुरेखा कांबळी यांच्यासह १२ जणांना वेंगुर्ले पोलिसांनी बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. मात्र, कोणतीही कारवाई न करता सायंकाळी उशिरा त्यांना सोडून देण्यात आले.
दरम्यान, आपल्या जमिनीत घुसून मोजणी व सीमांकन करण्यास आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार जमीनदारांनी पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांच्याकडे केली आहे.
कनयाळ येथे होणारा तेरेखोल ते रेडी हा पर्यायी रस्ता केवळ खासगी कंपनीच्या फायद्यासाठी होत आहे. त्यामुळे या रस्त्याचा जमीन संपादनाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी कनयाळ येथील ग्रामस्थांनी सरपंच सुरेखा कांबळी यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
तेरेखोल ते रेडी बंदराला जाण्यासाठी इतर रस्ते अस्तित्वात असताना खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी नवीन रस्ता केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांची होती. त्यामुळे रस्त्यासाठी जमीन संपादनास ग्रामस्थांचा विरोध आहे. जून महिन्यात बाधित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुन्हा सीमांकन करून घेण्याचे आदेश दिले होते. परंतु आजपर्यंत पुन्हा सीमांकन झालेले नाही.
त्यामुळे पुन्हा बेकायदेशीर नोटीस बजावून जमीन सीमांकन करावे, अशी लेखी मागणी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. असे असतानाही कोणतीही लेखी सूचना न देता बुधवारी सकाळी रेडी कनयाळ येथे दोन पोलीस व्हॅन व सुमारे १५० पोलिसांच्या फौजफाट्यासह प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार जगदीश कातकर, पोलीस निरीक्षक आर. बी. रजपूत, तलाठी धुरी, भूमीअभिलेखचे सर्व्हेअर चव्हाण यांनी खासगी जमिनीत घुसून थेट नीस लावून बेकायदेशीर सीमांकन कारवाई सुरू केली.
त्यावेळी त्या ठिकाणी तेथील जमीनदार उपस्थित राहिले व त्यांनी त्यांना याची विचारणा केली असता, आम्ही वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सरपंच सुरेखा कांबळी यांच्यासह नीलेश कामत, प्रकाश कामत, महादेव मराठे, सुनील सातजी, प्रमोद राऊळ, दत्तगुरू मराठे, प्रशांत कांबळे, गजानन राऊळ, अजित राणे, हरेष राणे, लक्ष्मीकांत राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. या सर्वांचे जाबजबाब घेऊन सायंकाळी उशिरा त्यांना सोडून देण्यात आले.
रेडी पोर्ट विकासासाठी शासनाने जॉन अर्नेस्टला कराराने दिलेला रेडी पोर्ट ५ वर्षे होऊनही कोणताही विकास अद्यापपर्यंत झालेला नाही. असे असताना फक्त जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन ती खासगी कंपनीच्या घशात घालण्याचा घाट राजकीय दबावाखाली प्रशासन करीत असल्याची प्रतिक्रिया रेडी ग्रामस्थांनी दिली. आताचे संपादित जमिनीतून जाणारा रस्ता तेरेखोल ते मारुती मंदिरपर्यंत जातो. त्यामुळे ज्या बंदरासाठी रस्ता संपादित केला जातो, तो हेतू पूर्ण होत नाही. पाच वर्षात रेडी पोर्टने मनमानी कारभार चालविला आहे. शासन म्हणजे स्थानिकांना विश्वासात घेऊन विकास करा. परंतु रेडी पोर्ट मनमानी कारभार करीत आहे. बेकायदेशीरपणे संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीत १२ घरे, मंदिरे व स्मशानभूमीत गुरांचे वाडे येत असल्याने त्या संपादनाला विरोध असल्याचे रेडी सरपंच सुरेखा कांबळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सरपंच सुरेखा कांबळी यांच्यासह ताब्यात घेतलेल्या १२ जमीनदारांशी तहसीलदार जगदीश कातकर, पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत यांनी जमीनमालकांचे वकील अॅड. प्रमोद आजगावकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात
आले. (प्रतिनिधी)