एकात्मता सायकल अभियान २८पासून होणार
By Admin | Updated: October 16, 2014 00:06 IST2014-10-15T22:17:54+5:302014-10-16T00:06:34+5:30
राष्ट्रसेवा दल, सांगलीचे १५वे राष्ट्रीय सायकल अभियान

एकात्मता सायकल अभियान २८पासून होणार
जाकादेवी : राष्ट्रसेवा दल, सांगलीचे १५वे राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियान २८ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचे दि. ३० रोजी जाकादेवीत आगमन होणार आहे.
राष्ट्रसेवा दल व सानेगुरुजी प्रतिष्ठान, सांगली - मिरजतर्फे प्रतिवर्षी १० दिवसांचे मोफत निवासी शिबिर घेण्यात येते. राष्ट्रीय एकात्मता सायकल अभियान, डिसेंबरमध्ये सात दिवसांचे ‘श्यामची आई’ ग्रंथ पारायण कार्यक्रम होतात.
मलकापूर - वारुळ - आंबा - खडीकोळवण - मारळ - हातीस - मार्लेश्वर मातृमंदिर देवरुख , संगमेश्वर - कर्णेश्वर मंदिर, डिंगणी - फुणगूस - जाकादेवी - चाफे, मालगुंड , मालगुंड ते जयगड व समुद्र किनारामार्गे रत्नागिरी नवनिर्माण कॉलेज, रत्नागिरी - पाली - नाणीज - साखरपा - आंबा अंबेश्वर हायस्कूल आंबा, मलकापूर - बांबवडे - बोरपाडले - यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी, कोडोली,- वाठार - पेठ वडगाव, हातकणंगले - जयसिंगपूर - अंकली - मिरज येथे सायंकाळी अभियानाची सांगता करण्यात येईल.
सुमारे ४५० ते ५०० किलोमीटरच्या या सायकल अभियानात १२ वर्षांच्या मानसी नागराळेपासून ८० वर्षे वयाच्या डॉ. रामचंद्र शांत व ७५ वर्षाच्या विमल शांत यांच्यासह सुमारे ५० ते ६० सायकलस्वार सहभागी होणार आहेत. सदाशिव मगदूम, रमेश हेगाणे, दिनकर आदाटे या अभियानाचे नेतृत्व करणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे समाज जागृती करणार असून, स्थानिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभियानाच्या संयोजकांमार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)