७३ कोटीचा आराखडा बनविण्याचे निर्देश
By Admin | Updated: November 25, 2014 23:59 IST2014-11-25T22:33:38+5:302014-11-25T23:59:01+5:30
२0१५-१६ आर्थिक वर्षासाठी : जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची माहिती

७३ कोटीचा आराखडा बनविण्याचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. मात्र आगामी सन २०१५-१६ साठीचा ७३ कोटी पर्यंतचाच जिल्हा नियोजन विकास आराखडा तयार करावा असे संकेत शासनाने दिले आहेत. तरीही जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ७३, १०० व १२५ कोटी रुपये असे तीन आराखडे तयार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांनी देतानाच पुढील वर्षीही १०० कोटींचा आराखडा मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला जिल्ह्यातील विविध विकासकामे करण्यासाठी दरवर्षी शासनाकडून जिल्हा नियोजनअंतर्गत निधी प्राप्त होतो. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता. या आर्थिक वर्षाचा आराखडा बनविताना ६८ कोटीपर्यंतच विकास आराखडा बनवावा असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यावेळी १०० कोटी रुपयांचा आराखडा शासनाने मंजूर केला होता.
आगामी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा आराखडा बनविताना तो ७३ कोटी ३८ लाखांच्या मर्यादेत बनवावा असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार ७३ कोटी ३८ लाखांचा एक तसेच १०० व १२५ कोटी असे दोन एकूण तीन विकास आराखडे बनविण्यात आले आहेत असे थोरात यांनी स्पष्ट केले.
६२ कोटी एवढा निधी प्राप्त
सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी मंजूर १०० कोटीपैकी आतापर्यंत ६२ कोटी एवढा निधी प्राप्त झाला असून हा सर्व निधी संबंधित विभागाना वर्ग करण्यात आला आहे तर उर्वरित निधी लवकरच प्राप्त होईल असेही जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
...अन्यथा आयुक्तांमार्फत
पाठविणार आराखडा
मंत्रालयात गेल्या आठवड्यातच बैठक झाली असून या आठवड्यात जिल्ह्याला पालकमंत्री नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या शक्यतेप्रमाणे पालकमंत्री नियुक्त झाल्यास जिल्हा नियोजन समितीची सभा घेऊन या बैठकीत हा आराखडा ठेवून मंजूर करण्यात येईल. तसे न झाल्यास जिल्हाधिकारी आयुक्तांमार्फत शासनास हा आराखडा सादर करतील असेही थोरात यांनी स्पष्ट केले.