शिवराज्याभिषेक नाट्यातून प्रेरणा
By Admin | Updated: February 2, 2015 00:08 IST2015-02-01T21:15:28+5:302015-02-02T00:08:08+5:30
सत्त्वशीलादेवी भोसले : बालकलाकारांचा प्रमाणपत्र देऊन गौरव

शिवराज्याभिषेक नाट्यातून प्रेरणा
सावंतवाडी : बालकांना घेऊन ऐतिहासिक नाट्य बसविणे कौतुकास्पद आहे. त्यांच्या संवेदनशील मनावर हा प्रसंग कोरला जाणार आहे. त्यामुळे हा इतिहास कित्येक वर्षे त्यांच्या लक्षात राहणार असून, त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल, असे गौरवोद्गार राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांनी काढले. प्रवीण परब निर्मित व डॉ. सोनल लेले दिग्दर्शित बालकलाकारांचा ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ हा कार्यक्रम येथील संस्थानकालीन राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमातील सर्व बालकलाकारांना सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र पोकळे आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष साळगावकर यांनी या बालनाट्याबद्दल कौतुकोद्गार काढून पुढेही अशीच नवनिर्मिती करावी, आपले सर्व सहकार्य राहील, असे सांगितले. राजेंद्र पोकळे यांनी बालकलाकारांचे कौतुक केले. नाट्याच्या दिग्दर्शिका डॉ. सोनल लेले यांनी आभार मानले. यावेळी पालकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)