पूरग्रस्त भागाची पाहणी अधिकाऱ्यांचे पथक
By Admin | Updated: August 7, 2014 00:29 IST2014-08-06T21:18:17+5:302014-08-07T00:29:28+5:30
अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार

पूरग्रस्त भागाची पाहणी अधिकाऱ्यांचे पथक
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार टाळंबाच्या अधिकाऱ्यांनी केली. पूरग्रस्त भागांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
कुडाळ तालुक्यातील भंगसाळ, कर्ली, बेलनदी तसेच अन्य नद्यांमुळे कुडाळ, सरंबळ, चेंदवण, बाव, पावशी तसेच अन्य काही गावांना पुराचा धोका निर्माण होतो. पुराचे पाणी तालुक्यातील अनेक घरांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून सर्व भागांची माहिती देण्याची सूचना जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी संबंधित विभागाला दिली आहे.
या आदेशाप्रमाणे कुडाळ तालुक्यातील पूरग्रस्त भागातील घरांचे सर्वेक्षण आंबडपाल टाळंबा शाखा अभियंता समाधान जगदाळे व स्थापत्य अभियंता प्रदीप मुळे यांनी केले. यावेळी त्यांनी चेंदवण, बाव, सरंबळ, पावशी येथील गावांचे सर्वेक्षण पूर्ण करून मंगळवारी सकाळी कुडाळ येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.कुडाळ शहरातील आंबेडकरनगरमधील अठरा तर लक्ष्मीवाडी व कविलकाटे येथील सुमारे दहा घरांमध्ये पुराचे पाणी शिरते. या घरांची या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. हा अहवाल ते जिल्हाधिकारी कार्यालयाला देणार आहेत. (प्रतिनिधी)
माहिती संकलन
या सर्वेक्षणाचा उद्देश असा आहे की, जिल्ह्यातील पूरग्रस्त भाग कुठे आहेत, धोका कोणाला आहे, याबाबतची माहिती शासनाकडे जमा होणार आहे. आपत्तीग्रस्तांना आपत्ती येण्याअगोदर सतर्क करणे, त्यांच्यापर्यंत तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी या माहितीचा उपयोग शासनाला होणार आहे, अशी माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.