‘त्या’ निधीची तपासणी करा
By Admin | Updated: July 29, 2014 23:00 IST2014-07-29T21:58:52+5:302014-07-29T23:00:46+5:30
परूळेकर यांची मागणी : दीपक केसरकरांवर टीका

‘त्या’ निधीची तपासणी करा
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रातून जो निधी आणून विकास केला, तो निधी कधी आणि कुठे खर्च झाला याची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते जयेंद्र परूळेकर यांनी केली आहे. तसेच विठ्ठल कामतांसारखा चांगला उद्योजक सावंतवाडीतून का गेला, याचा शोधही जनतेने घ्यावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. परूळेकर म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांना अचानक दहशतवाद दिसायचा बंद कसा झाला? असा सवाल करून, ते ज्या शिवसेनेत चालले आहेत, त्या शिवसेनेबाबत त्यांनी केलेली वक्तव्ये आम्ही लवकरच बाहेर काढू, असे सांगितले. आमदार केसरकर हे नारायण राणे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार होते. त्याचे काय झाले, याचेही उत्तर केसरकरांनी द्यावे आणि लवकरात लवकर हा दावा दाखल करावा. म्हणजे आम्हाला सर्व पुरावे समोर आणता येतील, असे डॉ. परूळेकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडीचा विकास केला अशी बतावणी करणाऱ्या केसरकर यांनी केंद्राचा निधी कुठे आणि कसा खर्ची घातला, याचे उत्तर द्यावे. पालिकेच्या अनेक प्रकल्पांवर निधी खर्ची घातला. पण त्याचा पुढे काय उपयोग झाला? यात मोठ्या प्रमाणात अनियमिता दिसून येत आहे, असा आरोप करून या सर्व निधीची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. परूळेकर यांनी केली.
यावेळी डॉ. परूळेकर यांनी, सावंतवाडीच्या विकासाबाबत काही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, हा तलावाभोवतीचा विकास आहे. मात्र शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याबाबत कुणाला काळजी नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच ज्याने संपूर्ण देशात शेकडो हॉटेल्स उभारली, त्या विठ्ठल कामतांसारख्या उद्योजकाने सावंतवाडी व वेंगुर्ले येथून काढता पाय का घेतला, याचा शोधही येथील जनतेने घ्यावा, अशी मागणीही केली. (प्रतिनिधी)