बारा मच्छिमारांची निर्दोष मुक्तता
By Admin | Updated: September 28, 2015 23:33 IST2015-09-28T22:15:55+5:302015-09-28T23:33:54+5:30
देवगड न्यायालयाचा निकाल : पर्ससीननेट नौकेवर हल्ला प्रकरण

बारा मच्छिमारांची निर्दोष मुक्तता
देवगड : देवगड पवनचक्की समोरील खुल्या समुद्रात पर्ससीननेट यंत्रधारक मच्छिमारी नौकेवर भरदिवसा हल्ला चढवून तोडफोड केल्याच्या व खंडणी मागितल्याच्या आरोपातून देवगड आनंदवाडी येथील १२ पारंपरिक मच्छिमारांची देवगड न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. देवगड पवनचक्कीवर सुमारे ७ वाव खोल समुद्रात दिनांक १८ एप्रिल २0१२ रोजी मालवण येथील प्रसिध्द पर्ससीननेट व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री. गोपीनाथ तांडेल यांच्या मालकीची ‘मखरेश्वर’ ही पर्ससीननेट मच्छिमारी नौका मासेमारी करताना पारंपरिक मच्छिमारांना आढळून आली होती.
यावेळेस देवगड आनंदवाडी येथील १२ पारंपरीक मच्छिमारांनी ‘मखरेश्वर’ नौकेवर ८ ते १० पारंपरीक नौकांचा वापर करून हल्ला चढविला आणि बोटीतील खलाशांना जबरी मारहाण केल्याची तक्रार मखरेश्वर बोटीचे मालक गोपीनाथ तांडेल यांनी १८ एप्रिल २0१२ रोजी देवगड पोलीसात दिली होती.
यावेळेस पारंपरीक मच्छिमारांनी बोटीतील सर्व खलाश्यांना भर समुद्रात मारहाण करून त्यांच्याकडून पन्नास हजार रूपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप देखील तक्रारदार व खलाश्यांनी केला होता. तांडेल यांच्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी आनंदवाडी येथील प्रदीप कोयंडे, गंगाधर कुबल, काशिनाथ कुबल, कुंजन मुणगेकर, प्रकाश बांदकर, महेश जोशी, गणेश कुबल, धाकू कोयंडे, निशिकांत कुबल, लिलाधर कोयंडे, उमाजी प्रभू ज्ञानेश्वर मालवणकर या १२ पारंपारीक मच्छिमार व्यवसायिकांविरूध्द ३४
कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यातील काही आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतला होता तर काही आरोपींना अटक देखील झाली होती.
सदर खटल्याची सुनावणी देवगड न्यायालयात दिनांक ३ जुलै २०१३ रोजी पासून देवगडचे प्रथमवर्ग न्यादंघधिकारी न्यायाधिश कमलेश माने यांच्या न्यायालयात सुरू झाली होती.
सुमारे दोन वर्ष चाललेल्या या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे स्वत: नौका मालक श्री. गोपीनाथ तांडेल आणि प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार असणारे एकूण ८ खलाशी साक्षीदार म्हणून तपासण्यात आले होते मारहाण
व खंडणीबाबत प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदारांनी उलट तपासा दरम्यान दिलेली विसंगत
उत्तरे आणि खटल्यातील प्रत्यक्ष पुराव्यातील तफावत या बाबी संशयित आरोपींच्या वकीलांनी युक्तिवाद दरम्यान न्यायालयात पटवून दिले.
उभय पक्षांची सुनावणी पूर्ण झाल्यावर देवगड न्यायालयाने २८ सप्टेंबर रोजी सर्व १२ संशयित आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. याकामी
सर्व बाराही आरोपींच्या वतीने देवगड येथील अॅड.कौस्तुभ मराठे व अॅड. प्रकाश बोडस यांनी बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहिले होते. (प्रतिनिधी)