कुबलने वापरलेली इंडिका कार जप्त
By Admin | Updated: July 20, 2014 22:15 IST2014-07-20T22:09:48+5:302014-07-20T22:15:50+5:30
चिपळूण पोलिसांचा तपास : मंत्र्यांचा पीए असल्याचे भासवून अनेकांना गंडा

कुबलने वापरलेली इंडिका कार जप्त
सावंतवाडी : वेंगुर्ले उभादांडा येथील विकास कुबल याने गृहमंत्र्याचा पीए असल्याचे भासवत अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार चिपळूण येथे उजेडात आल्यानंतर पोलिसांनी अनेकांना गंडा घालण्यासाठी कुबल याने वापरलेली इंडिका कार रविवारी सावंतवाडीतून जप्त केली आहे. तसेच गोव्यातील एका व्यक्तीच्या पाळतीवर चिपळूण पोलीस आहेत.
दरम्यान, विकास कुबल याचा जास्तीतजास्त वावर हा सावंतवाडीत होता. तसेच गृहमंत्र्याचा सचिव असल्याचे सांगत तो अनेकवेळा शासकीय विश्रामगृहावर थांबत असल्याचे आता पुढे आले आहे.
याबाबत माहिती अशी की, गृहमंत्र्याचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत विकास कुबल याने कोकण पट्ट्यात अनेकांना गंडा घातला होता. त्याचे बिंग अलिकडेच चिपळूण पोलिसांनी उघड केले.
चिपळूण येथील एकाला नोकरीचे अमिष दाखवून तब्बल अडीच लाख रूपये त्याने उकळले होते. पण त्याला नोकरी लागली नाही. या तक्रारीनंतर कुबल यांच्या मुंबईतून मुसक्या आवळण्यात आल्या. त्यानंतर एक- एक प्रकरण आता बाहेर पडू लागले आहे.
विकास कुबल यांची पूर्ण कोकणात मोठी बडदास्त होती. तो सावंतवाडी, वेंगुर्ले आदी ठिकाणी साहेबासारखा वावरत असे. स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून त्याने अनेकांना जमीन व्यवहार करूया तसेच नोकरी लावतो, माणसे घेऊन या, असे तो सांगत असे. त्यातून त्याची अनेकांशी ओळख होत गेली. सावंतवाडीत आला की, त्याला भेटण्यासाठी बरेचजण यायचे. त्याचे शासकीय विश्रामगृहातील बुकिंग ही मुंबईतून होत असे. त्यामुळे स्थानिक अधिकारी त्याला दचकून रहात असत. चिपळूण पोलिसांनी त्याला दोन दिवसापूर्वी मुंबई येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याचा बडेजाव आता समोर येऊ लागला आहे. तो जी इंडिका कार वापरत होता, ती कारही चिपळूण पोलिसांनी सावंतवाडीतून जप्त केली असून येथील सावंत नामक गॅरेजमध्ये पोलिसांनाही कार आढळून आली आहे. ही कार दुरूस्तीसाठी त्यांच्याकडे देण्यात आली होती. तर पोलिसांनी विकास कुबल यांच्यासोबत गोव्यातील सत्यवान नामक तरूण असे, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले असून तो अद्याप पोलिसांना सापडला नाही.
रविवारी दुपारी चिपळूण पोलिसांचे एक पथक गोव्यात गेले होते. तसेच दुपारी ते सावंतवाडीत दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईबाबत जास्त माहिती न देता ही कार चिपळूणकडे नेण्यात आली आहे. कुबल याने फसवणूक केली आहे, असे सांगणारी एकही तक्रार आमच्यापर्यंत आली नाही. तक्रार आली तर त्यांची चौकशी करू, असे ही यावेळी चिपळूण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.कार सावंत नामक गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी आली होती. त्याला ही कार चोरीची आहे, याची कल्पना नव्हती. रविवारी चिपळूण पोलीस थेट गॅरेजमध्ये आल्यावर याबाबतचे बिंग फुटले. त्यामुळे या कारवर १८ हजारांचा खर्च करण्यात आला होता. तो खर्च आता कोण देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)