दापोलीसाठी वाढीव नळपाणी योजना

By Admin | Updated: July 19, 2015 23:37 IST2015-07-19T22:48:48+5:302015-07-19T23:37:03+5:30

पाणी प्रश्न संपुष्टात? : २५ कोटीचा प्रस्ताव तयार

Incremental tilt plan for Dapoli | दापोलीसाठी वाढीव नळपाणी योजना

दापोलीसाठी वाढीव नळपाणी योजना

आंजर्ले : दापोली शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सोंडेघर धरण ते दापोली ही २५ कोटीची वाढीव नळपाणी योजना दापोली नगरपंचायतीकडून प्रस्तावित करण्यात आली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास दापोलीचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. दापोली शहराचा विस्तार गेल्या दहा वर्षात झपाट्याने वाढला आहे.शहराच्या सीमा लगतच्या जालगाव, गिम्हवणे, मौजेदापोली व टाळसुरे गावाना भिडल्या आहेत. सेकंड होम म्हणून शहरात सदनिका घेतल्या आहेत. त्यामुळे नवीन इमारतींची एक मोठी साखळीच दापोली शहरात उभी राहात आहे. यामुळे दापोली शहराची पाण्याची मागणी कमालीची वाढली आहे. सद्यस्थितीत दापोली शहराला प्रतिदिन २० लाख लीटर पाण्याची गरज भासते. भविष्यात ही मागणी आणखी वाढणार आहे. सद्यस्थितीत दापोली शहराला नारगोली व कोडजाई या दोन ठिकाणांवरून नळपाणी योजनेद्वारा पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या दोन्ही योजनांमधून मिळणारे पाणी दापोली शहराची पाण्याची मागणी पूर्ण करू शकत नाही. एप्रिल-मे मध्ये शहरावर पाणी कपातीची वेळ येते. दापोली नगरपंचायतीने यासाठी नवा पर्याय सोधला आहे. शहराची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन सोंडेघर ते दापोली ही वाढीव नळपाणी योजना प्रस्तावित आहे. या योजनेला अंदाजे २५ कोटी रूपये खर्च येणार आहे. दापोली ते सोंडेघर धरण हे अंतर १७ किलो मीटर आहे. मात्र, सोंडेघर धरणातून पाईपव्दारे हे पाणी शहरात आणले जाणार आहे. मात्र, १७ किलो मीटर लांबीच्या या पाईपलाईनमध्ये १३ किलोमीटरचा नैसर्गिक उतार मिळणार आहे. म्हणजेच एकूण १७ किलोमीटर अंतरापैकी १३ किलोमीटरपर्यंत पाणी ग्रॅव्हिटीने येणार आहे. यामुळे विजेचे बिल कमी येणार आहे. त्याचबरोबर दैनंदिन देखभाल खर्च कमी येणार आहे. म्हणजेच आर्थिक खर्चात मोठी कपात होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव दापोली नगरपंचायतीने तयार केला आहे. कोणत्याही धरणातून पाणी घेण्यासाठी पाणी आरक्षण मिळणे गरजेचे असते. अन्यथा धरणातून पाणी घेता येत नाही. सोंडेघर धरणात दापोली शहराला पाणी आरक्षण मिळावे, यासाठी दापोली नगरपंचायतीने प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने दापोलीला सोंडेघर धरणातील पाणीसाठ्यात आरक्षण दिल्यानंतर या योजनेचे अंदाजपत्रक तयार केले जाईल. त्यानंतर या योजनेच्या कामाला सुरूवात होईल. ही योजना कार्यान्वित झाल्यास दापोलीकरांची पाणी टंचाईपासून सुटका होणार आहे.
स्वप्नील महाकाळ यांनी लोकमतला सांगितले की, दापोलीची भविष्यातील ५० वर्षाची पाण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना आम्ही प्रस्तावित केली आहे. (प्रतिनिधी)

वाढते शहर , पाण्याची तरतूद हवी
दापोली शहर वाढते आहे. जिल्ह्यातील प्रमुख पर्यटक स्थळ म्हणून दापोली प्रसिध्द आहे. या शङरात अनेक भागातून येणाऱ्या नागरिकांचे वास्तव्य झाले आहे. या भागात असणाऱ्या सध्याच्या पाणी योजनेमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत होता. नागरिकरण वाढत आहे. नवीन योजना सुरू होत असल्याने या भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. २५ कोटीचा हा प्रस्ताव शूभ सूचक आहे.

Web Title: Incremental tilt plan for Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.