आचिर्णे, लोरेमध्ये हत्तींचा धुडगूस
By Admin | Updated: November 23, 2014 00:39 IST2014-11-23T00:32:32+5:302014-11-23T00:39:42+5:30
ग्रामस्थांमध्ये भीती : नेमणवाडीत घरात घुसून भात गोण्या तुडविल्या

आचिर्णे, लोरेमध्ये हत्तींचा धुडगूस
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे व लोरे गावांत काल, शुक्रवारी रात्री दोन रानटी हत्तींनी धुडगूस घातला. दोन गावांतील ऊसशेती, नारळ बागा, केळी आदींची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत लोरे नेमणवाडीतील शेतकऱ्यांच्या घराचा दरवाजा तोडून भाताच्या गोण्या तुडविल्या. त्यामुळे रात्रभर संपूर्ण नेमणवाडी व दर्डेवाडी ही गावे दहशतीखाली होती. दरम्यान, आज, शनिवारी सकाळी दोन्ही हत्ती वाघेरी-डामरेकडे गेल्याचे वनविभागाने सांगितले.
जिल्ह्यात १२ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या रानटी हत्तींनी मांडलेला उच्छाद शुक्रवारी रात्री पहिल्यांदाच लोरेतील शेतकऱ्यांनी अनुभवला. कणकवलीतील वाघेरी, घोणसरीतून शुक्रवारी दुपारी दोन रानटी हत्ती आचिर्णे घाणेगड परिसरात दाखल झाले होते. येथील गवताच्या गंजी हत्तींनी उद्ध्वस्त केल्या. तसेच लोरे सुतारवाडीतील कृष्णा मेस्त्री यांची ऊस शेती, रश्मी गुरव यांचा भुईमूग, देवयानी गुरव यांच्या केळी, नारळ झाडे, रताळींचे नुकसान केले. (प्रतिनिधी)
नारळ बाग, ऊसशेती जमीनदोस्त
लोरे नाचणेकरवाडीतील माळवदे या शेतकऱ्याची सुमारे अर्धा एकर ऊसशेती तुडवून जमीनदोस्त केली. तसेच गावातील अन्य शेतकऱ्यांच्या ऊसशेतीचे हत्तींनी नुकसान केले. येथील मधुकर विठोबा आग्रे यांच्या बागेतील सहा नारळाच्या झाडांची नासधूस केली. आचिर्णे व लोरेतील शेतकऱ्यांचे एका रात्रीत हत्तींनी लाखोंचे नुकसान केले.
दारात हत्ती, घरात धडकी
लोरे नेमणवाडीतील मनोहर बाबू दर्डे यांच्या घराच्या पुढील दरवाजावर रात्री ११.१५ वाजता हत्तीने धडक मारली, तेव्हा घरात ४ लहान मुलांसह ९ माणसे होती. हत्तीने घराचा पुढील दरवाजा तोडल्याने अंधारातच घरातील माणसांनी जीव वाचविण्यासाठी सर्व शक्ती एकवटून सुमारे २५ मिनिटे आतील दरवाजा आतून दाबून धरला होता. या काळात हत्तीने पडवीतील ६ ते ७ भाताच्या गोण्या सोंडेने अंगणात फेकून तुडवून नासधूस केली होती. तब्बल अर्ध्या तासानंतर हत्ती कुंपणाबाहेर गेल्यावर दर्डे कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला.
लोरेत रात्री हत्तींचे दर्शन
शुक्रवारी रात्री लोरेतील काही शेतकऱ्यांना दोन रानटी हत्तींचे तीन ते चार ठिकाणी दर्शन झाले. हत्तींच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी हातात दांडके घेऊन रात्र जागविली. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी आचिर्णे, लोरेत फिरून हत्तींनी केलेल्या नुकसानीची पाहणी केली. सकाळी ११च्या सुमारास हत्ती कणकवली तालुक्यातील वाघेरी डामरे गावाकडे परतले.