अवैध धंद्यांचे प्रमाण वाढतेय
By Admin | Updated: July 23, 2014 21:55 IST2014-07-23T21:43:05+5:302014-07-23T21:55:26+5:30
दोडामार्गमधील स्थिती : उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

अवैध धंद्यांचे प्रमाण वाढतेय
शिरीष नाईक ल्ल कसई दोडामार्ग
तालुक्यात अवैध धंद्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. तसेच दारूच्या नशेत अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. गावागावातील हे अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी होऊनसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
पोलीस या विरोधात काही प्रमाणात कारवाई करतात. मात्र, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी तालुक्यात पाठ फिरविल्याने अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
शासनस्तरावर दारूबंदी, जुगारबंदी, गुटखा बंदीसारखे निर्णय घेतले जाते. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याने अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तालुक्यातील काही गावांमधील दुकानांमध्ये सर्रास दारू, गुटखा विक्री सुरू आहे. या अवैध धंद्यांना त्वरित आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि महिलावर्गातून होत आहे. यासाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे आदी विविध मार्गांचा अवलंबही करण्यात आला. काही ठिकाणी अवैध धंदेवाईकांना पकडून पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले. मात्र, पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने धंदे जोमाने सुरू आहेत.
-गावातील तरुण पिढी या अवैध धंद्यांना बळी पडत आहेत. दारूच्या नशेत अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये सर्रास दारूविक्री होत असते. मात्र, याबाबत सरपंचांकडे व ग्रामस्थांकडे चौकशी केली असता, तसे काही नसल्याचे सांगितले जाते. पोलीस निरीक्षक जे. पी. सूर्यवंशी यांनीही तालुक्यात कुठेही अवैध धंदे सुरू नसल्याचे स्पष्टीकरण दिले. पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क विभागाचीही जबाबदारी असल्याचे त्यांचे म्हणणेही रास्त आहे. दारूबंदी अधिकाऱ्यांनी तालुक्यात पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गोवा जवळ असल्याने दोडामार्ग ते तिराळी रामघाट मार्गे मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दोडामार्ग येथे एक आणि तिलारी वीजकें द्र येथे दुसरा तपासणी नाका असूनही दारूची वाहतूक कशी होते, हा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे. दोन्ही खात्यांनी आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यापेक्षा अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू केल्यास हे अवैध धंदे नक्कीच बंद होतील.
माहिती द्या,
कारवाई करतो
दोडामार्ग तालुक्यात कुठेही अवैध धंदे सुरु नाहीत. अशाप्रकारचे कोणतेही धंदे सुरू असल्यास आम्हांला माहिती द्यावी. याबाबत त्वरित कारवाई करू. पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांविरोधात तीव्र मोहीम काढून आतापर्यंत १0 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- जे.पी. सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, दोडामार्ग