बीडीओंची वाढती रजा संशयाला किनार देणारी....
By Admin | Updated: January 2, 2016 08:28 IST2016-01-01T21:59:37+5:302016-01-02T08:28:54+5:30
सावंतवाडी पंचायत समिती : तीन महिने रजेवर; चार वेळा रजा वाढविली;वादग्रस्त प्रकरणांनी तर्कवितर्क

बीडीओंची वाढती रजा संशयाला किनार देणारी....
राजन वर्धन -- सावंतवाडी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी गेल्या तीन महिन्यापासून अखंडित रजेवर आहेत. पंचायत समितीतील निघालेली भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि त्यांनी तब्बल चार वेळा वाढविलेली रजा संशयाला किनार देणार ठरत आहे. वारंवार रजेवर राहिल्याने पंचायत समितीच्या कारभारावर तालुक्यासह जिल्ह्यातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सावंतवाडी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारीपदी सुमित कुमार पाटील ९ सप्टेंंबर २०१५ ला नियुक्त झाले. पाटील हे प्रोबेशनरी म्हणजे शिकाऊ कार्यकाळासाठी नियुक्त झाले होते. त्यांनी एक महिनाभर येथील कारभारात सुसूत्रताही आणली होती. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न तडीस नेण्याची मुख्य भूमिकाही त्यांनी बजावली. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही त्यांना चांगले सहकार्य केले होते. त्यामुळे येथील कारभार सुरळीत चालू होता. शिवाय येथील कामाचे प्रस्तावही नेटाने पुढे रेटले जायचे. वयाने तरुणतुर्क असल्याने नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनासुद्धा पंचायत समितीतील कारभार काहीकाळ भावला होता. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पंचायत समितीमार्फत तालुक्यातील सर्व गावांच्या सहभागाने शहरात शोभयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये अनेक गावातून उत्स्फूर्त सहभागही घेण्यात आला. त्यामुळे ही शोभायात्रा चांगलीच गाजली. ही शोभायात्रा निघाली १७ आॅक्टोबरला व याची पूर्वतयारी म्हणून १३ रोजी बैठक घेण्यात येणार होती; पण त्यापूर्व तयारी बैठकीच्या अगोदरच्या दिवशीपासूनच कार्यरत बीडीओ सुमीत कुमार पाटील हे १२ आॅक्टोबरपासून रजेवर गेले. सुरुवातीला ते पंधरा दिवसांच्या रजेवर गेले; पंधरा दिवस म्हणता तीन महिने होत आले तरी ते आजतागायत कामावर रुजू झाले नाहीत.
दरम्यान, पंचायत समितीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. काँग्रेसचे असणारे चार पंचायत समिती सदस्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निलंबित करण्यात आले, तर पंचायत समितीच्या मासिक बैठकीत वेर्ले येथील शौचालय वाटपातील झालेला घोटाळाही बाहेर आला. याशिवाय वेर्ले ग्रामपंचायतीतील कारभाराबाबतही अनेक तक्रारी ग्रामस्थांसह ठरावीक ग्रामपंचायत सदस्यांमार्फत करण्यात आल्या. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनामार्फत एकच खळबळ माजली.
याच दरम्यान, सहायक असणारे गटविकास अधिकारी मोहन भोई यांना बाहुले म्हणून गटविकास अधिकाऱ्यांच्या पदावर आरूढ करण्यात आले. भोई यांचा स्वभाव मितभाषी व सहनशील असल्याने त्यांनी साखळी पद्धतीने आलेल्या प्रशासकीय कामांचा निपटारा करण्यास सुरुवात केली. याचवेळी शिवसेनेसह विरोधी पंचायत समिती सदस्यांनी मासिक बैठकीत वेर्ले घोटाळ्याचा केलेला हल्लाबोल व निलंबित सदस्यांमुळे सत्ताधारी काँग्रेसचे अल्पमतात आलेले पदाधिकारी यामुुळे तर पंचायत समिती प्रशासनासह जिल्हा प्रशासनात एकच गोंधळ माजला.
हा हल्लाकल्लोळ एकीकडे माजला असतानाच दुसरीकडे रजेवर गेलेले बीडीओ पाटील यांनी आपली रजा आणखीनच वाढवून घेतली. साहजिकच या सर्व कारभाराला सामोरे जाण्याची वेळ प्रभारी बीडीओ भोई यांच्यावर येऊन ठेपली व त्यांनी ती प्रामाणिकपणे पेललीही.
वेर्ले प्रकरणात झालेला प्रथम दर्शनी भ्रष्टाचार आणि त्यामुळे येथील ग्रामसेवकाचे झालेले निलंबन यामुळे पंचायत समिती कारभारावर जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले. साहजिकच गटविकास अधिकारी पदावर प्रथमच आलेल्या पाटील यांना या प्र्रकरणाचा धसका बसणे साहजिक होते; पण खुद्द तेच रजेवर असल्याने हा सर्व प्रकार भोई यांच्या माथ्यावर पडला. पाटील यांनी आपली रजा वाढवून घेतली. सध्या मेडिकल रजेवर असल्याचे समजते, त्यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला दूरध्वनी अस्विकाराहर्य स्थितीत ठेवला होता. त्यामुळे ते जरी आजारी असले तरी पंचायत समितीच्या कारभारापासून अलिप्त राहिले, तर प्रभारी असणारे मोहन भोई यांच्यावर या सर्व प्रकाराचा डोलारा येऊन पडला.
नवनियुक्त यांनी तब्बल चारवेळा आपली रजा वाढवून घेतली; पण त्यांच्या रजेने त्यांनी पंचायत समितीच्या कारभारातून आपली बाजू काढल्याच्या प्रतिक्रिया पंचायत समिती परिसरातून व्यक्त होत आहेत.
एकंदरीत पाटील यांची वाढती रजा आणि पंचायत समितीतील विविध भ्रष्ट प्रकरणे बाहेर येण्याच्या प्रकाराने पंचायत समितीचा कारभार तालुक्यासह जिल्ह्यात चर्चिला जात आहे. तब्बल चार वेळा त्यांनी वाढवून घेतलेली रजा यामुळे ते पुन्हा परत येतील का नाहीत, अशी शंकाही निर्माण झाली आहे.
सध्याचे नियुक्त गटविकास अधिकारी पाटील हे आॅक्टोबरपासून त्यांच्या वैयक्तिक पातळीवर रजेवर आहेत. ते नेमक्या कोणत्या कारणास्तव रजेवर आहेत याची कल्पना आपल्यालासुद्धा नाही. त्यामुळे ते नेमके कधी हजर होणार आहेत, याबद्दल वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही.
- मोहन भोई, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सावंतवाडी.
प्रभारी पदाचा विक्रम
सावंतवाडी पंचायत समितीची स्थापना १ मे १९८५ ला झाली आहे. कार्यालयात नोंद असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाच्या फलकानुसार पंचायत समितीत तब्बल २५ वेळा प्रभारी गटविकास अधिकारी पद कार्यरत राहिले आहे.
यामुळे सांवतवाडी पंचायत समितीत गटविकास अधिकारीपद कायमस्वरूपी टिकत नसल्याचेच यावरून सिद्ध होते, असे म्हटले तर ते कुणी नाकारू शकणार नाही.