जिल्ह्यात डेंग्यूसदृश रूग्णांच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: November 2, 2014 00:41 IST2014-11-02T00:41:59+5:302014-11-02T00:41:59+5:30
हिवताप विभाग मात्र निद्रिस्त

जिल्ह्यात डेंग्यूसदृश रूग्णांच्या संख्येत वाढ
सिंधुदुर्गनगरी : वातावरणाच्या बदलामुळे जवळ जवळ संपूर्ण राज्यात डेंग्यू तापाने थैमान मांडले असून त्याची थोड्या प्रमाणात झळ सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसत आहे. जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असून हिवताप विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. ही साथ रोखण्यासाठी या विभागामार्फत फॉगींग मशिनद्वारे फवारणी अथवा कोणतीही प्रचार प्रसिद्धी केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, बारामती यासारख्या मोठ्या शहरांमध्ये गेले काही दिवस डेंग्यू तापाने थैमान मांडले असून या साथीचे हजारो रुग्ण सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेताना दिसून येत आहेत. या साथीच्या आजारामुळे राज्यात तीन युवतींचाही मृत्यू झाला आहे. अशा या भयानक साथीची काही अंशी झळ सिंधुदुर्गाला बसत असल्याचे रुग्णालयात तापाच्या वाढत्या रुग्णांवरून दिसून येत आहे. हे रुग्ण डेंग्यूसदृश्य व मलेरियाचे असल्याचे निष्पन्न होत आहेत. वातावरणातील बदलामुळे व ठिकठिकाणी सांडपाणी साचून राहिल्यामुळे या रोगाचा फैलाव होत आहे.
सध्या दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी पडली असून सुट्टीची मजा लुटण्यासाठी लहान मुले व त्यांचे पालक मुंबईसारख्या शहरांमध्ये आपल्या नातलगांजवळ गेले आहेत. त्याठिकाणी डेंग्यूची साथ आहे. आता शाळा सुरु होणार असल्याने ती मुले पुन्हा आपल्या गावी येणार आहेत. त्यामुळे या साथीचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सर्वस्वी कल्पना आरोग्य यंत्रणेला माहित असतानाही हिवताप विभागाच्यावतीने अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. शहरांच्या ठिकाणी फॉगींग मशिनने फवारणी करणे तसेच डेंग्यू या आजाराबाबत जनजागृती करणे, गृहभेट देणे गरजेचे होते. मात्र, तसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.
आरोग्य यंत्रणेने गाफिल राहू नये
जिल्ह्यात गेल्या वर्षापासून कोणत्याही साथरोगाचा फैलाव झालेला नाही. जिल्हा हा स्वच्छ असल्याने व आरोग्य यंत्रणेच्या कामकाजामुळे गेल्यावर्षीपासून कोणताही साथरोग उद्भवलेला नाही. मात्र, सद्यस्थितीत तापाचे रुग्ण वाढले असून आरोग्य विभागाने तत्काळ मोहीम आखून जनजागृती करून तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले
पाहिजेत. (प्रतिनिधी)