जमिनीचे बाजारमूल्य दुपटीने वाढविल
By Admin | Updated: November 20, 2014 00:00 IST2014-11-19T21:47:32+5:302014-11-20T00:00:40+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : शहरी भागात १0 टक्के तर ग्रामीण भागात ५ टक्के दरे

जमिनीचे बाजारमूल्य दुपटीने वाढविल
सिंधुदुर्गनगरी : सन २०१२ मध्ये शासकीय जमिनीचे बाजारमूल्य दुपटीने वाढविल्याने पुढील वर्षासाठी शासकीय जमिनीच्या दरात वाढ करू नये, या लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार शहरी भागात १० टक्के तर ग्रामीण भागामध्ये ५ टक्के बाजारमूल्यांचे दर वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली.
शासकीय जमिनीचे बाजारमूल्य ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, कणकवली नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगररचनाकार अधिकारे आदी उपस्थित होते. २०१२ मध्ये शासकीय जमिनींचे बाजारमूल्य ठरविताना तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी शहरी व ग्रामीण भागात दुपटीने वाढ केली होती. या निर्णयामुळे बिल्डर असोसिएशनमधून यावेळी आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाचा महसूल वाढला होता. मात्र, जमिनींचे व्यवहार कमी झाले होते. आता पुढील वर्षासाठी शहरी व ग्रामीण भागातील शासकीय जमिनीचे बाजारमूल्य वाढवू नये, अशी मागणी बिल्डर तसेच लोकप्रतिनिधींमार्फत करण्यात आली होती. याचा सारासार विचार करून आगामी वर्षासाठी शहरी भागामध्ये १० टक्के तर ग्रामीण भागामध्ये ५ टक्के बाजारमूल्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी ई. रवीेद्रन यांनी दिली.
जिल्हा नियोजन विभागाचा सन २०१५-१६चा आराखडा शासनास सादर केला आहे. हा आराखडा १२० कोटी, १५० कोटी व तिसऱ्या टप्प्यात ३०० कोटी अशा एकूण ३ टप्प्यात पाठविण्यात आला आहे. याला लवकरच मान्यता मिळणार आहे. तर सन २०१४-१५ साठीचे मंजूर झालेल्या १०० कोटींपैकी अजूनपर्यंत ६० कोटी रूपये जिल्हा नियोजन विभागास प्राप्त झाले असून उर्वरित ४० कोटीचा निधी हिवाळी अधिवेशनानंतर मिळणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
सिंधु महोत्सवाची तयारी सुरू
डिसेंबरअखेर प्रशासनामार्फत मालवणमध्ये सिंधु महोत्सव आयोजित करण्याचे निश्चित झाले असून त्याची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. या सिंधु महोत्सवासाठी ७० ते ८० लाख रूपये खर्च अपेक्षित असून हा खर्च जिल्हा नियोजन विभाग ३० लाख, शासनाकडून ४० लाख, यु.एन.डी.पी. १० लाख, जिल्हा परिषद १० लाख असा निधी उभा केला जाणार आहे. या सिंधु महोत्सवामुळे पर्यटकांचा ओघ वाढण्यास आणखीन मदत होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.