जिल्ह्यात विजेच्या मागणीमध्ये वाढ
By Admin | Updated: April 20, 2015 00:11 IST2015-04-19T22:21:44+5:302015-04-20T00:11:38+5:30
महावितरण कंपनी : दिवसाला लागतेय १८० मेगावॅट वीज

जिल्ह्यात विजेच्या मागणीमध्ये वाढ
रत्नागिरी : गेल्या पाच वर्षात वीज ग्राहकांची संख्या वाढत आहे. शिवाय उकाडा वाढल्यामुळेही विजेच्या मागणीत वाढ झालेली दिसून येत आहे. सध्या दिवसाला १८० मेगावॅट इतकी वीज लागते. उकाडा वाढल्यामुळे मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७४ हजार ५९ घरगुती ग्राहक आहेत, तर ७,७२८ वाणिज्यीक, तसेच ८१६ औद्योगिक ग्राहक आहेत. आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील एकूण ५ लाख ८७ हजार ९७० ग्राहकांकडून ६३ कोटी १५ लाख ५६ हजार ७३ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गतवर्षी महावितरणला ४९४ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. जिल्ह्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वीज ग्राहकही वाढत आहेत. शिवाय महावितरणच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याला १६५ ते १७० मेगावॅट इतकी वीज लागत असे. त्यामध्ये आता वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या दिवसाला १८० मेगावॅट इतकी वीज लागते. यापुढे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाच वर्षांचा आढावा घेतला तर दरवर्षी दीड ते दोन हजार ग्राहक वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण अल्प आहे. शिवाय वसुलीही चांगली आहे. महावितरणने सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. ज्या फिडरवर वीज गळती अधिक आणि आर्थिक वसुली कमी असलेल्या फिडरची वर्गवारी करून भारनियमनाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील फिडर्स अ, ब, क गटात येत असल्यामुळे भारनियमन बंद
आहे.
मागणी वाढल्यामुळे गतवर्षी मे महिन्यात काही ठराविक तासांसाठी राज्यात सक्तीचे भारनियमन करण्यात आले होते. राज्यात सक्तीचे भारनियमन राबविण्यात येते, त्यावेळी जिल्ह्याला त्याचा फटका बसत असला तरी सध्या जिल्ह्यात भारनियमन मात्र बंद आहे.
परंतु रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या तसेच जिल्ह्याचा विस्तार वाढत असल्यामुळे वीज ग्राहकांच्या संख्येत वाढत आहे. त्याचबरोबर सध्या उष्मा जास्त जाणवत असल्याने जिल्ह्यात वीजेची मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)