डॉक्टरांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ
By Admin | Updated: November 11, 2014 23:22 IST2014-11-11T22:17:35+5:302014-11-11T23:22:28+5:30
देवगडात रूग्णांची हेळसांड

डॉक्टरांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ
देवगड : देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये डॉक्टर रूग्ण व नातेवाईकांना सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्याने दिवसेंदिवस देवगड ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांच्या तक्रारीत वाढ होत आहे.
सर्वसामान्य रूग्णांना खासगी दवाखान्यात जाणे परवडत नाही. त्यामुळे रूग्ण ग्रामीण रूग्णालयात जात असतात. देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये डॉ. भिसे हे रूग्णांबरोबर उद्धट भाषा वापरून रूग्णांच्या आजारपणावर मात करण्याऐवजी रूग्णाचा आजार वाढवत आहेत.
गेल्या दोन महिन्यांमध्ये देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना योग्य उपचार न मिळाल्याने तसेच उपचारासाठी विलंब लावल्याने व हलगर्जीपणा केल्याने बालके प्रसुतीपूर्वीच दगावल्याचे प्रकारही घडले आहेत. ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्ण व नातेवाईकांनी तक्रारवहीमध्ये अनेक तक्रारी लिहिल्या आहेत.
मात्र, या तक्रारीची वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने डॉ. भिसे यांचा मुजोरपणा वाढला आहे. आमदार नीतेश राणे यांनी नुकतीच देवगड ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन डॉ. भिसे यांना रूग्णांना योग्य वागणूक व तपासणी करण्याचे सक्त आदेश दिले होते. तसेच काही लोकप्रतिनिधींनीही डॉ. भिसे यांना त्यांच्या कामगिरीच्या विरोधात घेरावही घातला होता.
मात्र, या प्रकाराचा डॉ. भिसेंवर कोणताही परिणाम झालेला नसून त्यांची मुजोरी व रूग्णांना नाहक त्रास देण्याचे काम सुरूच आहे. डॉ. भिसे यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी देवगडवासीयांतर्फे केली जात आहे.
रूग्णांचे प्राण वाचविणारे रूग्णालय आता डॉ. भिसे यांच्या अशा कृत्यामुळे मृत्यूचे द्वार बनले आहे. यामुळे ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्णांना तपासणीसाठी जाण्याची डॉ. भिसे यांच्या अशा कृत्यामुळे भीती वाटत आहे.
या समस्येचा गांभिर्याने विचार करावा तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)