देवगडमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारला
By Admin | Updated: July 31, 2014 23:31 IST2014-07-31T21:30:23+5:302014-07-31T23:31:45+5:30
शिक्षण विभागाचे प्रयत्न : २१९ शाळांना मिळाला ‘ब’ व ‘क’ दर्जा

देवगडमध्ये शैक्षणिक दर्जा सुधारला
पुरळ : ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या मुल्यांकनानुसार शाळांची गुणवत्ता ठरवली जाते. शाळांमधील सोयीसुविधा, शाळेची इमारत शैक्षणिक दर्जा या गोष्टींची तपासणी करून २०० गुण दिले जातात. या वर्षीच्या मूल्यांकनामध्ये देवगड शिक्षण विभागाने भरारी घेऊन २२४ शाळांमधून २१९ शाळांना मूल्यांकनात ब व क दर्जा मिळाला आहे. गतवर्षीच्या मूल्यांकनापेक्षा या वर्षीच्या मूल्यांकनामध्ये शाळांचा दर्जा वाढला असून देवगड शिक्षण विभागाने परिश्रम घेऊन ही गुणवत्ता प्राप्त केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे गुणवत्तापूर्वक शिक्षक आणि शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ग्रामविकास विभागाने पुढाकार घेऊन एक कार्य गटाची स्थापना केली होती. या कार्य गटाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे २०० गुणांवर मूल्यांकन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यात भौतिक सुविधांना ३५ गुण, शालेय व्यवस्थापनाला ६५ गुण आणि अध्ययन आणि अध्यापन यासाठी १०० गुण देण्यात येतात. त्यानुसार संबंधित शाळांना अ, ब, क, ड, इ अशी श्रेणी देण्यात येते. मिळालेली श्रेणी शाळेच्या बाहेर फलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. माजी गटशिक्षणाधिकारी महेश जोशी यांनी देवगड शिक्षण विभागाला प्रगतीच्या दृष्टीकोनातून एक विशिष्ट वळणावर नेले आहे. देवगड तालुक्यामध्ये यावर्षी अ मूल्यांकन मिळाला नसला तरी पुढीलवर्षी होणाऱ्या मूल्यांकनामध्ये अ दर्जाच्या शाळा जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न केला जाईल. असा मानस देवगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांनी व्यक्त केला आहे.
मोफत गणवेश वाटपही तालुक्यातील शाळांमध्ये जुलैमध्येच १०० टक्के करण्यात आले आहे. पंचायत समितीने यशवंत ग्रामसमृद्धी योजनेमध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून देवगडचे नावलौकीक केले आहे. शिक्षण विभाग शैक्षणिक दर्जा उंचावत मानांकन मिळविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करीत
आहेत. (वार्ताहर)
डोंगर कपारीत विस्तार
-देवगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा २२४ आहेत. देवगड तालुक्याचा विस्तार हा डोंगर व खेड्यापाड्यात विस्तारलेला आहे.
-अशा ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये प्रगती घडून देवगड शिक्षण विभागाने आपला शिक्षण विभाग प्रगतशीलतेच्या मार्गावर नेला आहे.
-राज्यामध्ये अ मूल्यांकन मिळालेल्या शाळा १५९९ आहेत.
-तर १४ हजार ९१८ शाळांना ब मूल्यांकन मिळाले आहे. अप्रगत विद्यार्थ्यांची प्रगती करून १०० टक्के मुले प्रगत करण्याचेही काम या विभागाने चोख केले आहे.