पडद्यामागील कलाकारांचा महत्त्वाचा सहभाग
By Admin | Updated: December 29, 2014 00:06 IST2014-12-28T21:36:16+5:302014-12-29T00:06:11+5:30
गिरीश ओक : कुडाळमध्ये रंगला गप्पाटप्पा कार्यक्रम

पडद्यामागील कलाकारांचा महत्त्वाचा सहभाग
कुडाळ : मालिका, सिनेमामध्ये आम्ही कलावंत मंडळी तुम्हाला दिसतो. त्यापाठीमागे कलादिग्दर्शक, कॅमेरामन, लेखक, निर्मिती सूत्रधार, स्पॉटमन यासारख्या अनेक व्यक्ती पडद्यामागून कार्यरत असतात, त्यांचेही तेवढेच योगदान निर्मितीमध्ये असते, असे उद्गार ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात काढले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे, कलादिग्दर्शक श्रीरंग भोसले, लेखक सचिन दरेकर, कॅमेरामन अशोक पवार, निर्मिती सूत्रधार विनोद नाईक, विवेक मथुरे उपस्थित होते.
आमच्यासारखे अभिनेते रंगभूमीने वाव दिल्यामुळे लोकप्रिय होतात. या पाठीमागे अनेक व्यक्ती असतात. पण ते प्रेक्षकांना दिसत नाहीत. त्यामध्ये कलादिग्दर्शक, कॅमेरामन, लेखक, निर्मिती सूत्रधार आदी व्यक्तीही कलावंतच असतात. फरक एवढाच की, आम्ही प्रेक्षकांना दिसणारे आणि ते न दिसणारे कलावंत हे समजण्यासाठी आजचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये डॉ. गिरीश ओक यांची प्रकट मुलाखत झाली. डॉ. ओक म्हणाले, टेलिव्हिजनवर दिसणारं सगळं मायावी असतं. टेलिव्हिजनवरील प्रेमाच्या कथा खऱ्या समजू नका, असे आवाहन केले.
झेंडा चित्रपटाचे लेखक सचिन दरेकर म्हणाले, लेखकांना प्रेक्षकांना आवडणारेच लिखाण करावे लागते. कधी वास्तव तर, कधी न आवडणारे लिहावे लागते. जाहिरातदार, पे्रक्षक व मालिकेमध्ये काम करणारे कलाकार या सर्वांना सांभाळावे लागते.
यावेळी नर्सिंग अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी वर्षा तुळसकर हिने ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेचे शीर्षक गीत गायिले. यावेळी कलादिग्दर्शक श्रीरंग भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. विवेक माथुरे यांनी ‘चलते चलते’ गीत गाऊन सांगता केली. या कार्यक्रमाला बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बी. एड.चे प्राचार्य डॉ. दीपाली काजरेकर, डी. एड्.चे प्राचार्य सरोज दाभोलकर, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य रमेश माळी, रुपाली नार्वेकर, जे. व्ही. परब, अनुष्का रेवंडकर, योगिता शिरसाट, परेश धावडे, नितीन बांबार्डेकर, क्रांती मयेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ सेंट्रल स्कूलच्या शिक्षिका पौर्णिमा दाभोलकर यांनी ईशस्वतनाने केला. सूत्रसंचालन नर्सिंग शिक्षिका प्रणाली मयेकर यांनी तर तेजस्विनी माजगावकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)