उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करा
By Admin | Updated: August 24, 2014 00:50 IST2014-08-24T00:49:07+5:302014-08-24T00:50:29+5:30
युवती अत्याचार प्रकरण : काँग्रेसची मोर्चाद्वारे मागणी, ...अन्यथा दहा दिवसात महामोर्चा

उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करा
सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्यांतर्गत असलेली दक्षता समिती बरखास्त करा. अल्पवयीन युवतीच्या लंैगिक अत्याचारात सहभागी उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी काँॅग्रेसच्यावतीने येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच येत्या दहा दिवसांत संबंधित आरोपींना अटक न केल्यास महामोर्चा काढू, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
या मोर्चाचे नेतृत्व काँॅग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, महिला अध्यक्षा प्रज्ञा परब, सरचिटणीस संजू परब, सभापती प्रियांका गावडे, तालुकाध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, प्रमोद कामत, निकिता जाधव, पंचायत समिती सदस्य महेश सारंग, प्रमोद सावंत, शहराध्यक्ष मंदार नार्वेकर, सुधीर अडिवडेकर, सरपंच सुप्रिया कुंभार, माजी नगरसेवक सुनिल पेडणेकर, महिला तालुकाध्यक्षा गीता परब, विरजा कदम, मीना सावंत, वैष्णवी ठोंबरे, शिला मांजरेकर, सुजाता चिंदरकर, वर्षा माजगावकर, नम्रता गावडे, शुभांगी नाईक आदींनी केले.
हा मोर्चा शहरातील माजी खासदार कार्यालयापासून सुरू झाला. तो गांधी चौकामार्गे शासकीय विश्रामगृहासमोरून पोलीस ठाण्याकडे गेला.
यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ जाऊन स्थिरावला. बाजारातून मोर्चा जात असताना मोर्चेकरांनी वेगवेगळ्या घोषणा दिल्या.
यात मोकाट फिरणाऱ्या आरोपींना अटक करा, दक्षता समिती बरखास्त करा, मागे मोर्चा काढणारे आता कुठे अशा विविध घोषणा महिलांनी दिल्या. तोंडावर काळ्या पट्ट्या बांधत या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे मोर्चातील महिलांनी सांगितले.
हा मोर्चा उपविभागीय कार्यालयात गेल्यानंतर तेथे पोलीस उपअधीक्षक व्हि. एन. चौबे यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चातील शिष्टमंडळाने आपले म्हणणे मांडल्यानंतर पोलीस उपअधीक्षक चौबे यांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून आम्ही याबाबतची माहिती गोळा करू, असे यावेळी सांगितले.
मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला होता. यावेळी वेंगुर्लेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रतनसिंग रजपूत, पोलीस निरीक्षक मनोज शेलार, शिवाजी पाटील, उपनिरीक्षक दाजी वारंग, दीपक वेडे, शरद पवार, सचिन दिवटे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता. (प्रतिनिधी)