अवैध दारूची वाहतूक; तिघे ताब्यात
By Admin | Updated: October 3, 2015 22:52 IST2015-10-03T22:52:32+5:302015-10-03T22:52:32+5:30
स्कॉर्पिओ पकडली : लाखाची दारू जप्त

अवैध दारूची वाहतूक; तिघे ताब्यात
सावंतवाडी : दाणोली- बांदा मार्गावरील बावळाट तिठा येथे अवैधरीत्या गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी सोलापूर येथील पर्यटकांची स्कॉर्पिओ कार वाहतूक पोलिसांनी पकडली. यात एक लाख रुपये किमतीची दारू आढळून आली आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघा पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोव्याहून स्कॉर्पिओ कारने सोलापूरच्या दिशेने जाणारे भिरुदेव दादा सलगर (वय ३६), अण्णा भीवा कोकरे (२९), बंडू लिंगदेव यादव (२४) यांच्याकडे गोवा बनावटीची दारू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी ही गाडी दाणोली-बांदा मार्गावरील बावळट तिठा येथे आली असता थांबविली व तपासणी केली. त्यात गोवा बनावटीची अवैध दारू असल्याचे आढळून आले. यामध्ये १९ बॉक्स रियल व्हिस्की, तीन बॉक्स बॅग पायपर, पाच बॉक्स मॅगडॉल, अशी मिळून एक लाख रुपये किमतीची दारू असून, पोलिसांनी स्कॉर्पिओ कारसह ही दारू जप्त केली. जप्त केलेल्या कारसह तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पंचनामा करून हा गुन्हा आंबोली पोलिसांकडे वर्ग केला आहे.
आंबोलीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गजेंद्र भिसे यांनी या तिन्ही आरोपींना उशिरा येथील न्यायालयात हजर केले. याबाबतची तक्रार वाहतूक पोलीस राजा राणे यांनी पोलिसांत दिली आहे. (प्रतिनिधी)