जमिनीचा बेकायदेशीर लिलाव
By Admin | Updated: January 3, 2015 00:14 IST2015-01-02T23:16:51+5:302015-01-03T00:14:31+5:30
सासोली येथील घटना : जमीनमालकांचे तहसीलदारांना निवेदन

जमिनीचा बेकायदेशीर लिलाव
कसई दोडामार्ग : सासोली गावातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, हा दृष्टीकोन ठेवून काही वर्षांपूर्वी सासोली- हेदूसवाडी येथील काही ग्रामस्थांनी जमीन उपलब्ध करून दिली. कागद कारखान्यांसाठी ही जागा विधायक कामासाठी दिली असताना या जमिनीची खोटी कागदपत्रे बनवून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नसताना या जमिनींची जी बेकायदेशीररित्या लिलाव पद्धत करण्यात आली, त्या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन जमीन आमच्या ताब्यात मिळावी, अशी मागणी सासोली येथील जमीन मालकांनी गुरुवारी दोडामार्ग तहसीलदार संजय जाधव यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले.
मौजे सासोली- हेदूसवाडी सर्वे नं. ४७/२३ ब +४५ ब, ४७/२५, ४७/२६, ४७/२५ अ, ४७/२४, ४७/२३ अ ही जमीन सिंधुदुर्ग येथील हाथकागद सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेला सासोली येथे कागद कारखाना होत असल्याने तसेच येथील लोकांना रोजगार मिळेल, या आशेने कारखान्यांसाठी ही जमीन दिली होती.
सासोली-हेदूसवाडी येथील कारखान्याच्या लोकांच्या जमिनीचा झालेला गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर जमीन मालक नारायण कृष्णा शिरसाट, दत्ताराम धाऊसकर, दयानंद धाऊसकर, ज्ञानेश्वर धाऊसकर, गेविंद धाऊसकर, बाळा धाऊसकर, बापू सावंत, आनंद सावंत, संंतोष परब, संजय सावंत, प्रेमानंद धाऊसकर, विठ्ठल धाऊसकर, चंद्रकांत धाऊसकर, अमोल धाऊसकर, वासुदेव परब व अन्य जमीन मालकांनी अॅड. अनिल दळवी यांच्यासोबत गुरूवारी दोडामार्ग तहसीलदार संजय जाधव यांची भेट घेऊन या जमिनीची बेकायदा लिलाव पद्धत त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
तत्कालीन जिल्हाधिकारी विरेंद्र सिंग यांचे कोणतेही आदेश नसताना बोगस लिलाव पद्धत अवलंबून कोट्यवधी रुपयांची जमीन हडप करण्याचा घाट कारखान्याच्या संचालकांनी घातला असून याला आमचा तीव्र विरोध आहे. आमची जमीन आम्हाला परत मिळावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली.
सासोली-हेदूसवाडी येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या जमिनीच्या सातबाराचे अवलोकन करता, आमच्या जमिनी मालकांकडून खरेदी केल्या आहेत. ही बाब पूर्णपणे चुकीची आहे.
सासोली- हेदूसवाडी येथील आमच्या जमिनी मुलांना नोकऱ्या देऊन कागद कारखाना चालविला जाईल, या मूळ हेतूने आमच्या वारसदारांनी दिल्या होत्या. मात्र, मूळ हेतूला हरताळ फासून ही जमीन करोडो रुपयांना विकण्याचा घाट महसूल प्रशासनाकडून केला जात आहे. शिवाय जी नोटीस बजावण्यात आली आहे, त्याला आमचा तीव्र विरोध आहे. नोटीसमधील जंगम मालमत्ता या ठिकाणी उपलब्ध नसताना नोटीसही बेकायदेशीर आहे.
या नियमबाह्य बाबींचा आम्ही निषेध करतो, असे नमूद करून सासोली कागद कारखाना शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रियेची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात, अशी मागणी सासोली ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसीलदार संजय जाधव यांची भेट घेऊन केली आहे. (वार्ताहर)