वेतोरे येथे अवैध दारूसाठा जप्त

By Admin | Updated: October 31, 2014 00:40 IST2014-10-31T00:40:07+5:302014-10-31T00:40:22+5:30

एकास अटक : दीड लाखाचा मुद्देमाल ताब्यात; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

Illegal ammunition seized here at Watore | वेतोरे येथे अवैध दारूसाठा जप्त

वेतोरे येथे अवैध दारूसाठा जप्त

बांदा : वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे घराच्या पडवीत बेकायदा साठवून ठेवण्यात आलेल्या गोवा बनावटीच्या दारूसाठ्यावर आज, गुरुवारी दुपारी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने छापा टाकला. यावेळी १ लाख ६८ हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूचे ५0 बॉक्स जप्त केले. याप्रकरणी शंकर काशिराम सातार्डेकर (वय ३५, रा. वेतोरे-वरचीवाडी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
शंकर सातार्डेकर यांच्या राहत्या घरात बेकायदा दारुसाठा असल्याची माहिती उत्पादन शुल्क खात्याचे इन्सुली तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक रमेश चाटे व संजय दळवी यांना मिळाली होती. जिल्हा अधीक्षक दिलीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर भागवत, एच. आर. वस्त, प्रसाद माळी, मोहन पाटील, अमित पाटील यांच्या सहकार्याने आज दुपारी सातार्डेकर यांच्या घरात छापा टाकण्यात आला.
घराच्या मागील पडवीत गोवा बनावटीच्या नॅशनल डॉक्टर ब्रॅण्डचे १८0 मि.ली. मापाच्या दोन हजार ४00 बॉटल असलेले ५0 बॉक्स आढळले. उत्पादन खात्याने १ लाख ६८ हजार रुपये किमतीचा अवैध माल जप्त केला. तसेच शंकर सातार्डेकर यांच्यावर गैरकायदा मद्यसाठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली. शंकर सातार्डेकर वेंगुर्ले परिसरात गोवा बनावटीच्या दारूचा पुरवठा करतात. तपासादरम्यान त्याने सदरचा दारुसाठा हा वेंगुर्ले येथील रियाज नामक व्यक्तीने दिल्याचे सांगितले. तो नियमित पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून दारूचा पुरवठा करत असल्याचे त्याने तपासात सांगितले आहे.
त्यामुळे तपासी निरीक्षक रमेश चाटे रियाज नामक व्यक्तिच्या शोधात आहेत. तसेच शंकर सातार्डेकर वेंगुर्ले तालुक्यात कोणाकोणाला दारूचा पुरवठा करतो यादृष्टीने देखील तपास करण्यात येणार असल्याचे दिलीप मोरे यांनी सांगितले. संशयित शंकर सातार्डेकर याला उद्या, शुक्रवारी सावंतवाडी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal ammunition seized here at Watore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.