ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: November 16, 2014 23:47 IST2014-11-16T21:49:22+5:302014-11-16T23:47:24+5:30
ऊर्जितावस्थेची गरज : बांदा येथील रामभट स्वामींच्या समाधीस्थानाची दुरवस्था

ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष
नीलेश मोरजकर- बांदा -बांदा परिसरातील ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या कित्येक वास्तू दुर्लक्षामुळे लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. सटमटवाडी येथील जागृत असलेले शिवकालीन संतश्रेष्ठ श्री रामभट स्वामींचे समाधीस्थानदेखील दुर्लक्षामुळे मोडकळीस आले आहे. रामभट स्वामींनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदानही दिले आहे. हा इतिहास काळाच्या ओघात लुप्त होऊ नये, यासाठी सटमटवाडी येथील युवकांनी येथे श्रमदानाने साफसफाई करुन इतिहासकालीन समाधी व त्याचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या स्थळाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास व्हावा अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.
ऐतिहासिक ठेव्याला पुनरुज्जीवन प्राप्त करुन देण्यासाठी येथील युवकांनी दाखविलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. या दुर्लक्षित पर्यटनस्थळाच्या विकासाची प्रतीक्षा असून या भागचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास झाल्यास या समाधी स्थळाचा इतिहास पुढील पीढीला समजण्यासाठी मदत होणार आहे.
स्वामींच्या सेवेसाठी असलेली त्यांची दासी मनकरणी हिच्या दगडातील पादुका आजही येथे पहावयास मिळतात. तसेच पर्वताच्या खालीदेखील त्यांच्या सेवेकऱ्यांची समाधी पहावयास मिळतात. स्वामींचे बरेचसे शिष्य हे महाराष्ट्रात होते. हिंदवी स्वराज्य स्थापनेत रामभट स्वामींनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. शिवाजी महाराजांच्या कालावधीत तळकोकणातील राज्यकारभाराची माहिती सांडणीस्वारांमार्फत पारकडाकडून रायगडावर पाठवली जायची. त्यात स्वामींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
शिवकालीन समाधीस्थळाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या स्थळाची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. या स्थळाचा इतिहास जगासमोर यावा आणि या परिसराचा विकास व्हावा, याचा ध्यास घेत या ठिकाणी श्रमदानाने साफसफाई करण्याचा निर्णय येथील युवकांना घेतला. युवकांनी सातत्याने श्रमदान करीत या स्थळाला नवी झळाळी प्राप्त करुन दिली आहे.
दरवर्षी पावसाळ्यानंतर याठिकाणी साफसफाई मोहीम राबविण्यात येते. यामध्ये जीवबा वीर, महादेव वसकर, महेंद्र मांजरेकर, सच्चिदानंद मांजरेकर, विवेक केळुस्कर, प्रसाद वीर, सुरज मांजरेकर, संजय केळुस्कर, विठ्ठल केळुस्कर, रामचंद्र तांबुळकर, देवानंद कळंगुटकर, प्रमोद कळंगुटकर, ज्ञानेश्वर मावळणकर, मिलिंद कळंगुटकर, मनोज मांजरेकर, संदेश मांजरेकर, राजू वीर, अक्षय आरोसकर, दिनेश वीर, रोहित रेडकर, संजय वसकर, विष्णु केळुस्कर आदी युवकांसह सटमटवाडी ग्रामस्थांनी मेहनत घेतली. दरवर्षी याठिकाणी रामभट स्वामींची पुण्यतिथी व पूजा कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात येतात. मठ पर्वतावर जावून धार्मिक कार्यक्रम करणे शक्य नसल्याने पर्वताच्या खाली मठ बांधण्यात आला आहे. त्याठिकाणी नित्यनेमाने पूजा अर्चा करण्यात येते.
या स्थळाच्या विकासासाठी पर्यटन खात्याकडे प्रस्ताव सादर करणार आहे. या ठिकाणी शालेय विद्यार्थी एकदिवसीय सहलीसाठी येतात. मात्र, योग्य सुविधा नसल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक नेहमीच नाराजी व्यक्त करतात. या स्थळाकडे जाण्यासाठी डोंगरात पायऱ्यांची निर्मिती करण्याचा ग्रामंपचायतीचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्रिय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांचेकडे निधीसाठी मागणी प्रस्ताव सादर केला आहे.
- शीतल राऊळ, बांदा सरपंच,
मठपर्वतावरील हनुमंताचे शिल्प, गणपतीचे शिल्प व स्वामींच्या सेवेसाठी असलेल्या मनकरणी दासीच्या पादुकांचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.
मठपर्वतावरील पाण्याच्या तळीत गोड्या पाण्याचा आस्वाद घेता येत आहे.