आमच्या प्रश्नांची उत्तरे असल्यास दौरा करा
By Admin | Updated: June 11, 2015 00:36 IST2015-06-10T23:14:12+5:302015-06-11T00:36:13+5:30
पालकमंत्र्यांना इशारा : देवबाग तारकर्लीतील हॉटेल व्यावसायिक आक्रमक

आमच्या प्रश्नांची उत्तरे असल्यास दौरा करा
मालवण : तारकर्ली देवबाग येथील हॉटेल व्यावसायिक प्रांताधिकारी रविंद्र बोंबले यांच्या कारवाईला कंटाळले असून यापुढे अधिकाऱ्यांना देवबाग तारकर्ली गावात अनधिकृत बांधकाम कारवाईच्या अनुषंगाने पाय ठेवू दिला जाणार नाही. गुरुवारी पालकमंत्री दीपक केसरकर देवबाग येथे येत आहेत. त्यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरे असल्यास त्यांनी देवबाग गावाचा दौरा करावा, असा इशारा देवबाग तारकर्ली येथील हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी रविंद्र बोंबले यांनी तारकर्ली देवबाग येथील बांधकामांवर जी कारवाई सुरु केली आहे त्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्धार पत्रकार परिषदेवेळी हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला.
देवबाग तारकर्ली येथील हॉटेल बांधकामांवर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उचलल्याने बुधवारी तारकर्ली देवबाग येथील हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत देवबाग येथे पत्रकार परिषद घेतली.
यावेळी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना देवबाग तारकर्ली येथील सुमारे ४० हॉटेल व्यावसायिकांनी आपली कैफियत मांडली. यावेळी मालवणचे उपसभापती देवानंद चिंदरकर, भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, मोहन केळुसकर, बाबू बिरमोळे आदी उपस्थित होते. यावेळी हॉटेल व्यावसायिक म्हणाले, तारकर्ली देवबाग येथील हॉटेलची बांधकामे पाडण्याची कारवाई रविंद्र बोंबले यांनी सुरु केली आहे. ही बांधकामे पाडण्याऐवजी किंवा त्यावर कारवाई करण्याऐवजी मार्गदर्शन करून सीआरझेडअंतर्गत असणारी ही बांधकामे कायमस्वरूपी कशी होतील याचे मार्गदर्शन केले असते तर चांगले झाले असते.
मात्र गेले चार महिने सीआरझेडबाबत प्रांताधिकाऱ्यांकडे आम्ही मार्गदर्शन मागत असतानाही प्रांताधिकाऱ्यांकडून ते दिले जात नाही. प्रांताधिकाऱ्यांनाच सीआरझेडच्या मर्यादा माहित नसल्याचा आरोप करून हॉटेल व्यावसायिक म्हणाले जिल्ह्याची पर्यावरण समितीच अस्तित्वात नाही.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा अधिकार हा या समितीला आहे. मात्र प्रांताधिकारी मंत्री असल्यासारखे कारवाई करीत सुटले आहेत असे सांगितले. यावेळी प्रांताधिकाऱ्यांच्या कारवाईचा हॉटेल व्यावसायिकांनी निषेध
केला. (प्रतिनिधी)
१७ जूनला उपोषण
तारकर्ली देवबाग येथील बांधकामांबाबत महसूल विभागाने जी कारवाई सुरु केली आहे ती कारवाई थांबवावी यासाठी देवबाग तारकर्ली येथील सुमारे ४० हॉटेल व्यावसायिक १७ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. यावेळी निर्णय झाल्यास शासनास जाग येईल असा पर्याय निवडतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कारवाई थांबविण्याचे पर्यावरणमंत्र्यांचे आदेश
तारकर्ली देवबाग येथील हॉटेल व्यावसायिकांच्या बांधकामावर महसूल विभागाने जी कारवाई सुरु केली आहे त्या संदर्भात मनोज खोबरेकर, दिलीप घारे, झाट्ये यांच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन देवबाग तारकर्ली येथील हॉटेल व्यावसायिकांची बाजू मांडली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देवबाग तारकर्ली येथील ती बांधकामे निवासी असल्याने वेगळ्या पॉलिसीची गरज आहे. त्यामुळे महसूल विभागाने सुरु केलेली कारवाई थांबवावी अशाप्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.