अहवाल नसल्यास बडगा

By Admin | Updated: February 25, 2015 00:11 IST2015-02-24T22:01:18+5:302015-02-25T00:11:52+5:30

भडकंबा ग्रामपंचायत : रवींद्र वायकर यांची ताकीद

If you do not have reports, | अहवाल नसल्यास बडगा

अहवाल नसल्यास बडगा

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून ४ सदस्यांनी राजीनामा दिला. तंटामुक्ती पुरस्काराचा गैरवापर करण्यात आला. गावातील मुस्लिमवाडी रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट झाले. व्यायामशाळा नसताना खोटी इमारत दाखवून २ लाखांचे साहित्यच २ वर्षात आणलेले नाही, अशी तक्रार तेथील शंकर लाड यांनी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात केली. त्यामुळे खळबळ माजली. येत्या ७ दिवसांत याबाबतचा अहवाल अधिकाऱ्यांनी न दिल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, अशी तंबी रवींद्र वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.
सोमवारी वायकर यांनी येथील अल्पबचत सभागृहात घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात अत्यंत कुशलतेने २९ तक्रारींचा निपटारा केला. रस्ते, साकव, बिल्डर्सशी संबंधित विषयांवर यामध्ये विशेषत्त्वाने चर्चा झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे उपस्थित होते.
खेडशी येथील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत व बिल्डरने केलेले निकृष्ट बांधकाम, सातबारावर नावे दाखल करणे, स्मारक उभारणे, शेतकरी विमा अपघात, शिरगाव शेट्येवाडी खारभूमी योजना, अनुकंपा तत्त्वावर नोकरी, खेडशीत बिल्डरने अवैधरित्या घातलेला गडगा, चिंचखरी वाडी वेसुर्लेतील ५५० ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न, कोळंबे संतनगर रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न, सुरेंद्र घुडे यांच्या निवृत्ती वेतनाची निश्चिती, अनुकंपा तत्त्वावर नोकरी, मिरजोळे पाटीलवाडीतील जलवाहिनी खोलवर टाकणे, नागरी संरक्षण कार्यालय रत्नागिरीत सुरू होऊन नियुक्ती मिळणे, टॅँकरने दिवसाआड पाणी देऊन पाण्याची गैरसोय करणाऱ्या बिल्डरवर कारवाई यांसारख्या विषयांवर पालकमंत्री वायकर यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून या समस्या सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
काळबादेवी येथील पांडुरंग पेडणेकर यांच्या वडिलोपार्जित घराची घरपट्टी ग्रामपंचायतीने २००५ पासून बंद केली. ग्रामपंचायतीने आपणास न सांगता ठराव करून आपला घराचा हक्क काढून घेतला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश वायकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. या जनता दरबारात हर्षल पटवर्धन, प्रभाकर कदम, सुरेंद्र घुडे, उदय गमरे, दत्तात्रय गावखडकर, विलास काळे, स्वाती पड्याळ यांच्यातर्फे उदय देसाई, प्रकाश शेट्ये, अनिल जाधव, सुमित भातडे, तुषार भोजे, प्रवीण सावंत, युवराज पाटील, सुनील साळुंखे, चंद्रशेखर डिचोलकर, युसुफ मुकादम, मनोजकुमार सावंत, शबनम झारी यांनी जनता दरबारात आपल्या समस्या मांडल्या. (प्रतिनिधी)

भाट्येतील ‘ती’ जागाही ताब्यात घ्यावी
भाट्येतील सर्व्हे नंबर १०१ मधील कृषक कामाच्या जमिनीच्या गैरवापराप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देऊनही त्यानंतरच्या दोन महिन्यांत त्याची अंमलबजावणी न झाल्याने संबंधितांनी बेकायदा बांधकाम हटवण्यास स्थगिती घेतली. या प्रकरणाचा फेरतपास झाला पाहिजे. याप्रकरणी योग्य तपास केला जावा, उर्वरित ८० गुंठे जागा शासनाने ताब्यात घ्यावी, अशी मागणी माजी आमदार विजय तथा अप्पा साळवी यांनी केली. याबाबत वायकर यांनी स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन दिले व अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.

Web Title: If you do not have reports,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.