आघाडी सन्मानाने न झाल्यास स्वबळासह पर्यायाचा विचार
By Admin | Updated: July 30, 2015 00:28 IST2015-07-29T23:15:57+5:302015-07-30T00:28:15+5:30
अतुल रावराणे : नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका

आघाडी सन्मानाने न झाल्यास स्वबळासह पर्यायाचा विचार
वैभववाडी : वैभववाडी आणि दोडामार्ग या दोन्ही नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी पक्षाने स्थानिक पातळीवर चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आम्हाला सन्मानाने सोबत घेतले तर आघाडी केली जाईल. अन्यथा, स्वबळासह सर्व पर्यायांचा विचार केला जाईल, असे मत युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.येथील विश्रामगृहावर रावराणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश रावराणे, युवक तालुकाध्यक्ष महेंद्र रावराणे, राजेंद्र्र रावराणे, संतोष बोडके, धुळाजी काळे, ग्रामपंचायत सदस्य लवू पवार, आदी उपस्थित होते. रावराणे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र असून आम्ही आमच्या पक्षाची ताकद वाढविण्यावर भर देत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्यांदाच युवकाची स्वतंत्रपणे सदस्य नोंदणी सुरू केली आहे. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून जिल्ह्यात नवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान आम्हाला अधिक महत्वाचा आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आम्ही दोन्ही ठिकाणी १७ प्रभागात चाचपणी सुरू केली आहे. आघाडीसाठी धर्मनिरपेक्ष पक्षाला प्रथम प्राधान्य राहील. त्यानुसार वरिष्ठांशी चर्चा करून काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय घेतला जाईल. मात्र, तोही सन्मानाने झाला तरच! अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू किंवा कार्यकर्त्यांच्या मताने आघाडी संबंधी इतर पर्यायांचा विचार केला जाईल. काँग्रेसकडून आघाडीसंदर्भात आमच्यावर जे काही आरोप केले जातात ते सर्व त्यांनाही लागू पडतात, असा टोलाही त्यांनी लगावला. रावराणे यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आमच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच भ्रष्टाचारात बुडाले आहेत. सहा महिन्यात ही स्थिती आहे. पुढे काय होणार हे सांगता येणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप होताच आमचे मंत्री राजीनामा देऊन चौकशीला सामोरे गेले परंतु भाजपचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खुर्चीला चिकटून आहेत. त्यामुळे जनतेचा या सरकारकडून पुरता अपेक्षाभंग झाला आहे. (प्रतिनिधी)
पक्षाध्यक्ष शरद पवार यांना ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने पक्षाने हे वर्ष कृतज्ञता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्गात लवकरच दोन ठिकाणी बेरोजगार युवक, युवतींसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. त्याचबरोबर पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
- अतुल रावराणे, युवक प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी