केंद्राचा निधी मिळाला नाही तर राजीनामा देईन...
By Admin | Updated: January 5, 2015 23:22 IST2015-01-05T22:57:33+5:302015-01-05T23:22:46+5:30
गजानन कीर्तिकर : आसूद येथे खासदार आदर्श गाव योजनेचा शुभारंभ

केंद्राचा निधी मिळाला नाही तर राजीनामा देईन...
दापोली : खासदार आदर्श गाव या महत्त्वाकांक्षी योजनेतून आसूदचा विकास करणे हे माझे ध्येय आहे. भविष्यात या विकासासाठी निधी देण्यात केंद्र सरकारकडून अडचण आल्यास मी माझ्या खासदारकीचा राजीनामा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देईन, असा इशारा मुंबईतील खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिला.
दापोली तालुक्यातील आसूद या गावाची निवड खासदार आदर्श गाव योजनेसाठी खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली आहे. आज या योजनेचा शुभारंभ केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत आसूद येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार कीर्तिकर म्हणाले की, नैतिक, भौतिक व आर्थिक विकास करणे, हे या योजनेचे प्रमुख ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु करताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्राच्या विविध योजनांचा लाभ कसा देता येईल, याचे आखणी केली आहे. केंद्र शासनाच्या ६४ योजना गावात राबवण्यात येणार असून, संपूर्ण गाव पुढील तीन वर्षात आदर्श करण्याचा आपला मानस आहे. या गावामध्ये निरक्षरतेचे प्रमाण अत्यल्प आहे. सुशिक्षित मंडळींना पर्यटन व अन्य संधीतून रोजगार मिळवून देण्याचा माझा मानस असून, बचत गटांनीही गावच्या विकासात चांगले योगदान दिले आहे. त्यांनाही मी प्रोत्साहन देणार असून, या परिसरात उत्पादित होणारा शेतमाल व फळांवर प्रक्रिया करण्यात येईल. या मालाला मुंबईत मी बाजारपेठ उपलब्ध करुन देणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या योजनेसाठी अमोल कीर्तीकर व नितीन सावे यांची संयुक्त नियुक्ती केले असून, ग्रामपंचायतीच्यावतीने ७२ जणांची एक समिती नेमण्यात आली आहे. हे सर्वजण अधिकाऱ्यांशी संवाद साधून ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करतील. अधिकाऱ्यांनीही या योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. नियम, अटी यांची सबब सांगू नये. कोणाच्याही दबावाखाली अधिकारी या योजनेच्या हेतूला बाधा आणत असतील तर मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करेन, असे ते म्हणाले.
राज्य पातळीवर सरकारमध्ये मीही काही वर्षे काम केले असल्याने अधिकाऱ्यांची मानसिकता व पद्धत मला माहीत आहे. उगाचच अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम मी करत नाही, असे सांगतानाच अधिकाऱ्यांनीही याच पद्धतीने या योजनेसाठी काम करावे ,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते म्हणाले, २०२० मध्ये विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसण्यासाठी जोपर्यंत खेड्यांचा विकास होणार नाही तोपर्यंत ते शक्य नाही, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना आखली आहे. यापुढे आमदारांसठी आदर्श गाव योजना लागू होणार आहे. आपण या योजनेसाठी दिवेआगर गावाची निवड केली असून, खासदार कीर्तीकर यांनी आसूद गाव दत्तक घेऊन आपल्यावरील भार कमी केला आहे.
यावेळी आसूदचे सरपंच विष्णू वारसे यांनी उपस्थितांचे ग्रामपंचायतीच्यावतीने, तर वसंत शिर्के यांनी गावाच्यावतीने उपस्थितांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)