वेद वाङमयाचे अभ्यासक हीच लोकमान्य टिळकांची ओळख

By Admin | Updated: August 3, 2015 22:29 IST2015-08-03T22:29:46+5:302015-08-03T22:29:46+5:30

धनंजय चितळे : भावंडांनी मांडले गीतारहस्यातील संसारशास्त्र

The identity of Lokmanya Tilak of the Vedic literature | वेद वाङमयाचे अभ्यासक हीच लोकमान्य टिळकांची ओळख

वेद वाङमयाचे अभ्यासक हीच लोकमान्य टिळकांची ओळख

रत्नागिरी : भारतीय असंतोषाचे जनक आणि तेल्यातांबोळ्यांचे पुढारी मानले जाणारे लोकमान्य टिळक जगभरातील प्राच्यविद्या अभ्यासकांना तसेच संस्कृत पंडितांना वेदवाङमयाचे अभ्यासक म्हणून ओळखत होते, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे यांनी केले. प्रतिभा बिवलकर आणि डॉ. विद्याधर करंदीकर या दोन भावंडांनी गीतारहस्यातील संसारशास्त्र आणि पुरुषार्थ विचार उलगडला.टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीनिमित्त ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणाऱ्या चर्चासत्रांतर्गत चितळे यांनी ‘गीतारहस्यातून दिसणारे अभ्यासक टिळक’ या विषयावरील निबंध सादर केला. त्यामध्ये त्यांनी अनेक लेखकांची मते व्यक्त करून टिळकांच्या अभ्यासूवृत्तीचा आढावा घेतला. स्वातंत्र्याची चळवळ आणि राजकारण सांभाळतानाच त्यांचे चिंंतन आणि वाचन सतत सुरू होते. अफाट स्मरणशक्ती आणि कुशाग्रबुद्धीची देणगी त्यांना लाभली असल्याचे सांगितले. पाश्चात्य तत्त्वज्ञानाबरोबरच भारतीय वाङमयातील वेद, उपनिषदे, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा इत्यादींचाही सखोल अभ्यास केला.
प्रतिभा बिवलकर यांनी भगवद्गीतेसाठी टिळकांनी संसारशास्त्र हा सुंदर शब्द प्रथम वापरला, असा संदर्भ देत त्यांनी गीतारहस्यातील कर्मयोगशास्त्राविषयी विवेचन केले. योग्य काय आणि अयोग्य काय, याचा निर्णय घेण्यासाठी गीता उपयुक्त ठरते. गीता हे नीतीशास्त्र आणि कोणत्या प्रसंगी कसे वागावे, हे सांगणारे व्यवहारशास्त्र आहे, असे सांगितले. यज्ञचक्र चालवण्यासाठी कर्म हवेच. प्रत्येकाने चांगले काम करत राहावे. फळाची आसक्ती धरू नये. आसक्ती हे दु:खाचे मूळ आहे. कर्माचे फळ केव्हा आणि कसे मिळेल, हे सांगणे अवघड असते. ‘कर्मफल कर्म करण्याचा उद्देश किंवा हेतू, कर्माचे चिंंतन, पद्धती, परिणाम आणि कर्म करतानाची स्थिती या पाच निकषांवर आधारित असते, असे सांगून बिवलकर यांनी या पाचही निकषांचा उहापोह केला. पौराणिक आणि आधुनिक काळातील कथा व विविध प्रसंग सांगून मुद्दे त्यांनी अधिक स्पष्ट केले.
बिवलकर यांचे बंधू डॉ. विद्याधर करंदीकर यांनी ‘गीतारहस्यातील पुरुषार्थ विचार आणि वर्णाश्रमविचार’, या विषयावरचा आपला निबंध विविध उदाहरणांसह सादर केला. निवृत्ती हाच गीतेचा संदेश असल्याचे मानले गेल्याने प्रवृत्तीकडे कल असलेल्या, पुरूषार्थी, पराक्रमी समाजाची निर्मिती झाली नाही. त्यामुळेच भारत पारतंत्र्यात ढकलला गेला, अशी त्यांची खंत होती. तत्कालीन राजकीय स्थिती लक्षात घेता थेट शब्दात गीतारहस्यामध्ये ती खंत आली नसली, तरी ती जाणवावी, अशा अनेक जागा गीतारहस्यात असल्याचे डॉ. करंदीकर यांनी स्पष्ट केले.
समाजधारणेसाठी कोणती व्यवस्था असावी, हे सांगण्याचा गीतेचा उद्देश नाही. व्यवस्था कोणतीही असली, तरी संपूर्ण समाजाचे हित साधतानाच आत्मश्रेय साधले गेले पाहिजे, हे गीताशास्त्राचे तात्पर्य असल्याचे टिळक सांगतात, असेही डॉ. करंदीकर यांनी सांगितले.
चर्चासत्रात दोन दिवस सहभागी झालेल्या श्रोत्यांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी दिल्या. निवृत्तांनी नव्हे, तर तरुणांनीच गीतारहस्य वाचायला हवे, याची जाणीव चर्चासत्राने करून दिल्याचे मत वर्षा फाटक यांनी व्यक्त केले. श्रीकांत वहाळकर, वैशाली कानिटकर, रेणुका भडभडे, विश्वनाथ बापट इत्यादींनीही आपापली मते व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: The identity of Lokmanya Tilak of the Vedic literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.