मनसेशी माझा कोणताही संबंध नाही
By Admin | Updated: June 22, 2014 01:43 IST2014-06-22T01:19:05+5:302014-06-22T01:43:11+5:30
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक : अभिषेक वेंगुर्लेकर यांची स्पष्टोक्ती

मनसेशी माझा कोणताही संबंध नाही
वेंगुर्ले : मनसेचे जिल्ह्यात अस्तित्व असते तर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले नसते. मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि हितचिंतक यांच्यामुळेच नगरसेवक म्हणून निवडून आलो. उपनगराध्यक्ष म्हणून माझी झालेली बिनविरोध निवड ही सुध्दा नगर परिषदेतील सर्व नगरसेवकांमुळेच झाली आहे. त्यामुळे माझा मनसेशी कोणताही संबंध नाही. यापुढे मनसेच्या स्वयंघोषित नेत्यांनी माझा मनसेशी संबंध जोडू नये, असे आवाहन वेंगुर्लेचे उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
अभिषेक वेंगुर्लेकर हे मनसेत असल्याचे सांगत आहेत, तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झाल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी स्पष्ट केले होते. तर त्यांच्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतील, अशी माहिती मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी कणकवली येथे पत्रकारांना दिल्याचे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर याचा खुलासा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वेंगुर्लेकर बोलत होते. उपनगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मी कोणत्याही गटाचा आणि कोणत्याही पक्षाचा नसून जनतेचा सेवक असल्याचे जाहीर केले होते. जुलै २०१३ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मनसेने मला निलंबित केल्याचे वृत्तपत्रातून वाचले. परंतु, मला मात्र तसे कोणतेही पत्र अद्याप मिळालेले नाही. तरीदेखील त्याचवेळी माझा मनसेशी संपर्क तुटला होता, असे वेंगुर्लेकर यांनी सांगितले. ज्यावेळी माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली होती, त्यावेळी आताचे मनसेचे नेते गप्प का होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नगरपरिषदेच्या निवडणुकीत मनसेचे पानिपत होताना वेंगुर्लेतून केवळ मी एकमेव मनसेचा नगरसेवक निवडून आलो होतो. मालवण व सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक लढविलेल्या मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची अनामत रक्कमही जप्त झाली होती. त्यामुळे मी मनसेमुळे नाही, तर जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळेच निवडून आलो. राज ठाकरे यांनी मनसेच्या नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन केले असते तर जिल्ह्यातील मनसेचे उमेदवार निवडून आले असते. माझा मनसेशी काहीही संबंध नाही, यापुढे मनसेच्या नेत्यांनी अभिषेक वेंगुर्लेकर हा विषय काढू नये, असा इशारा वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मनसेचे परशुराम उपरकर व राजन दाभोलकर यांचे मनसेमध्ये जे दोन गट आहेत, त्यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात मनसेने आपले उमेदवार निवडून दाखवावेत. नंतरच मनसेच्या स्वयंघोषित नेत्यांनी विधानसभेची स्वप्ने पहावीत, असा सल्लाही अभिषेक वेंगुर्लेकर यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)