मला कोणत्याही पदाची लालसा नाही
By Admin | Updated: July 19, 2014 23:51 IST2014-07-19T23:33:11+5:302014-07-19T23:51:34+5:30
राणेंचे सावंतवाडीत प्रतिपादन

मला कोणत्याही पदाची लालसा नाही
सावंतवाडी : माझे हे बंड नाही किंवा कोणत्या पक्षातही जाणार नाही. पण मला काँग्रेसने जी कमिटमेंट दिली होती ती पूर्ण झालेली नाही. काँग्रेसने सहा महिन्यात मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापपर्यंत त्याची पूर्ती केलेली नाही. मला प्रचार समिती अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष या दोन्ही पदांची लालसा नाही, असे राणे म्हणाले.
राजीनामा देणार म्हटल्यावर अन्य पक्षातील कोणी माझ्याशी संपर्क केला नसल्याचा खुलासाही यावेळी त्यांनी केला. ते सावंतवाडीत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, दत्ता सामंत, संदेश पारकर, अशोक सावंत, संजय पडते आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, आमदार केसरकर यांनी माझ्यावर विनाकारण टीका सुरू केली आहे. ही टीका थांबली नाही तर मी गप्प बसणार नाही. मग खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यास ती सहन करण्याची ताकद केसरकरांनी ठेवावी, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
राजीनामा दिल्यानंतर जर मला पक्षश्रेष्ठीनी दिल्लीत चर्चेसाठी बोलावले तर मी नक्की जाईन. तसेच मुख्यमंत्री माझ्याबरोबर चर्चा करत असतील तरीही चर्चा करेन, असेही यावेळी त्यांनी जाहीर केले.
तसेच या राजकीय भूकंपाला तुम्ही कोकण वादळ म्हटले तरी हरकत नाही, असे मिश्कीलपणे नारायण राणे यांनी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)