समुद्रात चक्रीवादळाचा इशारा
By Admin | Updated: June 30, 2016 00:07 IST2016-06-29T23:48:42+5:302016-06-30T00:07:55+5:30
सावधानता बाळगा : जिल्हा प्रशासनाचे आवाहन

समुद्रात चक्रीवादळाचा इशारा
रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. त्यातच प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने येत्या २४ तासांत अरबी समुद्रात चक्रीवादळाचा इशारा दिला असून, याबाबत रत्नागिरीतील जनतेने सावधानता व सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हवामान केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार, समुद्रात वायव्येकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, पोरबंदर-गुजरातच्या पश्चिमेकडे व मसिराह-ओमानच्या पूर्वेकडे चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ही चक्रीवादळ स्थिती दक्षिणेच्या दिशेने ५ किलोमीटर प्रतितास वेगाने सरकत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत अरबी समुद्र किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या शुक्रवारपासून पावसाने संततधार धरली आहे. त्यामुळे नदीनाले भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे बुधवारी एका घराच्या पडवीवर दरड कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये घरातील चारजण जखमी झाले. या घटनेनंतर रत्नागिरी तहसीलदार मच्छींद्र सुकटे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व मदत कार्य सुरू करण्यात आले. यावेळी दरडीत अडकलेल्या एका महिलेला वाचवण्यात आले.
दापोली-नवानगर येथे घराचे अंशत: १२,६०० रुपये एवढे नुकसान झाले व अंगणवाडीचे ३ लाख २५ हजारांचे नुकसान झाले. पाडले येथेही (पान ७ वर) एका घराचे अंशत: २२,३०० रुपयाचे नुकसान झाले. उटंबर येथे गोठ्याचे ५७ हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले. संगमेश्वर-कसबा येथे वडाचे झाड गणेश मंदिरावर कोसळून १ लाख ८० हजार १०० रुपयाचे नुकसान झाले, तर एका घराचे ५ हजारांचे नुकसान झाले. देवरुख येथील पार्वती पॅलेसजवळ आंब्याचे झाड कोसळले मात्र, अन्य कोणतीही हानी झाली नाही. रत्नागिरी-पेठकिल्ला येथे वनिता वासुदेव सुर्वे यांच्या घरावर दरड कोसळली. तेलीआळी येथे नारळाचे झाड कोसळून वीज वाहक तार तुटली तर शिवाजीनगर-रत्नागिरी येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक दोन ते तीन तास एका बाजूने करावी लागली. झाड तोडून नंतर मार्ग मोकळा करण्यात आला. दरम्यान, पावसाने बुधवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली.