शेकडो हात सरसावले---चिपळुणातही स्वच्छता मोहीम

By Admin | Updated: November 16, 2014 23:55 IST2014-11-16T21:21:20+5:302014-11-16T23:55:38+5:30

धर्माधिकारी प्रतिष्ठान : शिस्तबध्द, प्रामाणिक मोहिमेचे कौतुक

Hundreds of Hands escaped - Cleanliness campaign in Chiplun | शेकडो हात सरसावले---चिपळुणातही स्वच्छता मोहीम

शेकडो हात सरसावले---चिपळुणातही स्वच्छता मोहीम

रत्नागिरी : देशभरात सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ मोहिमेंतर्गत रत्नागिरी शहरातही ‘स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी’ मोहीम १४ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आज (रविवार) नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अडीच हजार अनुयायांनी संपूर्ण शहरात अप्रतिम स्वच्छता मोहीम राबविली. शहरातील प्रत्येक गल्ली-गल्लीत जाऊन या प्रतिष्ठानच्या अनुयायांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या व प्रामाणिकपणे स्वच्छता मोहीम राबविली. त्यात कोठेही दिखावूपणा नव्हता, अशा प्रतिक्रिया रत्नागिरीवासियांतून व्यक्त करण्यात आल्या.
सकाळी ७ वाजल्यापासून या मोहिमेला प्रतिष्ठानच्या अनुयायांनी प्रारंभ केला. त्यांनी संकलित केलेला कचरा घेण्यासाठी पालिकेच्या कचरा गाड्या कार्यरत होत्या. शहरातील साळवी स्टॉप ते मिरकरवाडापर्यंत मुख्य रस्त्याची संपूर्ण झाडलोट करण्यात आली. गटाराच्या बाजूला साचलेला कचरा, पिशव्या, डबरही गोणपाटात भरून तो कचरा गाड्यांमध्ये ओतला जात होता. प्रतिष्ठानच्या अनुयायांनी वेगवेगळे गट केले होते. या कार्यकर्त्यांची शिस्तबध्दता हा शहरवासियात चचेचा विषय होता.
शहराच्या मुख्य रस्त्याबरोबरच शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांच्या बाजुलाही असलेला मोठ्या प्रमाणातील कचरा, डबर तसेच वाढलेली झुडुपेही तोडून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ केला. पालिकेचे सफाई कामगारही त्यांना सहकार्य करीत होते. (प्रतिनिधी)

चिपळुणातही स्वच्छता मोहीम
चिपळूण : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे व नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने आज रविवारी चिपळूण शहर व परिसराची स्वच्छता करण्यात आली. वर्षानुवर्षे वाशिष्ठी नदीकिनारी साचलेला गाळ व कचरा या मोहिमेअंतर्गत जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात आला.
रविवारी सकाळी ७ वाजता बहादूरशेख नाका येथून या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. गांधीनगर, बहादूरशेख नाका, खेर्डी, गुहागर बायपास, भोगाळे, चिंचनाका, मार्कंडी, बाजारपेठ, तलाठी कार्यालय, खेंड, पेठमाप, उक्ताड, विश्रामगृह ते हायवे दुतर्फा रस्त्याचीही स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेचे वैशिष्ठ्य म्हणजे वर्षानुवर्ष वाशिष्ठी नदीत साचलेला गाळ व कचरा जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, आगवे, अलोरे, सती, कापसाळ, पाचाड येथील कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेवून शहर व परिसर स्वच्छ केला.
वाशिष्ठी नदीतील गाळ अंदाजे ७० हून अधिक डंपर भरुन उचलण्यात आला. त्यामुळे नदी परिसर स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. मुख्याधिकारी प्रकाश पाटील, सीमा चव्हाण, नगरसेवक इनायत मुकादम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, प्रताप शिंदे, आरोग्य निरीक्षक अनंत हळदे, अशोक साठे यांनीही या मोहिमेत सहभाग दर्शविला आज रविवारी सुट्टीचा दिवस असताना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहकार्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभर राबविण्यात येत आहे. शहरामध्ये ३० जणांचा एक गट तयार करण्यात आला होता. या गटाच्या माध्यमातून परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Hundreds of Hands escaped - Cleanliness campaign in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.