शेकडो भाविक सातेरी चरणी नतमस्तक
By Admin | Updated: July 19, 2014 23:51 IST2014-07-19T23:32:22+5:302014-07-19T23:51:43+5:30
वार्षिक जत्रोत्सव : मालवण तालुक्यातील बिळवस येथील जलमंदिर

शेकडो भाविक सातेरी चरणी नतमस्तक
चौके : मालवण तालुक्यातील मसुरे गावच्या बारा वाड्यांची मूळ भूमिका मानल्या जाणाऱ्या बिळवसच्या जलमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणाऱ्या, भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री देवी सातेरीचा आषाढ महिन्यातील वार्षिक जत्रोत्सव शनिवारी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडला.
निसग सौंदर्याने नटलेल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री देवी सातेरी मंदिर सुमारे ७०० वर्षांपूर्वीचे आहे असे जाणकार सांगतात. श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव एक दिवसाचा असल्याने देवीची ओटी भरण्यासाठी मसुरे व इतर गावातील शेकडो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु श्री देवी सातेरी देवालय ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि पोलीस बंदोबस्त यांच्या सुनियोजनामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ होत होते.
असा पार पडतो जत्रोत्सव
बिळवसमधील प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थ मंदिरात एकत्र जमून आषाढातील जत्रेची तारीख ठरवितात. जत्रेदिवशी गावातील चाकरमानी, माहेरवाशिणी व देवीचे हजारो भक्तगण दर्शनासाठी येतात. यात्रेदिवशी सकाळी देवीला नीळ घालतात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तेल व गवताची राख मिसळून हा नीळ बनवला जातो.
नंतर देवीला वस्त्रालंकार, मुखवटा घालून नेसविले जाते. त्यानंतर देवीच्या समोर मडक्यात भात ठेवतात व त्यात खोबऱ्याच्या वाटीत पेटता काकडा तेल ओतून पेटत ठेवतात. दुपारी देवीला प्रत्येक घरातून नैवैद्य आणला जातो.
मानाप्रमाणे धार्मिक विधी होऊन पूर्वरितीप्रमाणे गाऱ्हाणी व ओट्या भरण्यास प्रारंभ होतो. यावेळी भक्त दर्शन घेऊन नवस बोलतात व नवसफेड करतात. संपूर्ण मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने भरून जातो. सायंकाळी देवीच्या समोर ठेवलेले मडके गावकर मंडळी घेऊन वाजत गाजत गांगोची राय येथे नेतात व त्याठिकाणी वाडी करून गाऱ्हाणे घालतात. पुन्हा ते मडके मंदिराकडे घेऊन येतात.
ग्रामस्थांनी देवीसमोर ठेवलेला प्रसाद वेगळा करून दोन भाग देवीसमोर व एक भाग ताटात ठेवतात. त्यानंतर गाऱ्हाणे करून एक भाग मानकरी कुळकर यांना देतात व जमलेला दुसरा भाग जमलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. त्यानंतर देवीवरील वस्त्रे, दागिने उतरवून देवीच्या पेटाऱ्यात ठेवून तो पुन्हा वाजतगाजत नेऊन मानकऱ्यांकडे पोहोचवला जातो.
जत्रेदिवशी रात्री मंदिरात कुणीही थांबत नाही. भाविकांनी कुठूनही बोललेला नवस किंवा मागणे देवी सातेरी पूर्ण करतेच अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या जत्रोत्सवासाठी ओट्या, खेळणी, हॉटेल तसेच खाजाची दुकाने थाटण्यात आली होती. शेकडो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन सातेरी चरणी नतमस्तक झाले. (वार्ताहर)