मानव विकास सभेला एस. टी. अधिकाऱ्यांची दांडी
By Admin | Updated: November 27, 2014 00:53 IST2014-11-26T22:09:03+5:302014-11-27T00:53:13+5:30
नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा वैभववाडी ग्रामस्थांचा इशारा

मानव विकास सभेला एस. टी. अधिकाऱ्यांची दांडी
वैभववाडी : मानव विकास कार्यक्रमाच्या तालुका समितीच्या सभेला एस. टी. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे समिती सदस्यांसह विद्यालयांचे मुख्याध्यापक व उपस्थित सरपंचांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुका समितीच्या नियोजनानुसार एस. टी. च्या वेळापत्रकाची दोन दिवसांत अंमलबजावणी न झाल्यास विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक व समिती सदस्यांनी एकत्रित आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मानव विकास तालुका समितीची सभा गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झाली. या सभेला तहसीलदार विजय जाधव, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर, नियोजन विभागाचे प्रतिनिधी घोरपडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी हांडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सरपंच, ग्रामसेवक व कृषीचे अधिकारी उपस्थित होते.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सातत्याने कळीचा मुद्दा बनली आहे. तालुकास्तरावरून दिलेल्या नियोजनाची एस. टी. कडून अंमलबजावणी होत नाही. लोकप्रतिनिधी तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखलही महामंडळाचे अधिकारी घेत नसल्याने एस. टी. महामंडळाच्या मानव विकासच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या सभेला एस. टी. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दांडी मारून वाहतूक नियंत्रकांना सभेला पाठविले. मात्र अधिकाऱ्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसल्याने उपस्थितांनी वाहतूक नियंत्रक बोडेकर यांना फैलावर घेतले.
वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थिनींच्या मोफत प्रवास सेवेसाठी शासनाने ५ एस. टी. बस दिल्या. मात्र त्यांचा विनियोग योग्यप्रकारे होत नाही. त्यामुळे या बसेसच्या वापराच्या अहवालाची मागणी करीत महामंडळाकडून त्या बसेसचा गैरवापर होत असल्याने देखभाल व इंधनासाठी दरवर्षी दिला जाणारा निधी तत्काळ थांबविण्याची मागणी नासीर काझी यांनी केली. त्यावेळी २७ नोव्हेंबरपासून अंमलबजावणीचे आश्वासन एस. टी. अधिकाऱ्यांनी दिल्याचे गटविकास अधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले. त्यावर येत्या दोन दिवसांत नियोजनानुसार मानव विकासच्या एस. टी. वेळापत्रकाची अंमलबजावणी न झाल्यास विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक व समिती सदस्य एस. टी. काराभाराविरोधात आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला.
मानव विकास अंतर्गत फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेच्या मुद्यावर कृषी विभागाचा निष्काळजीपणा सभेत उघड झाला. त्यामुळे ४० लाखांची फिरती माती परीक्षण परीक्षा प्रयोगशाळा म्हणजे तालुक्याच्या गळ्यात बांधलेला दगड आहे असे मत काझी यांनी व्यक्त केले. तसेच या विषयावर कृषी खात्याचे अधिकारी निंबाळकर यांना धारेवर धरले.(प्रतिनिधी)
‘मानव विकास’मध्ये भ्रष्टाचार : काझी
मानव विकास कार्यक्रम फक्त वैभववाडी तालुक्यासाठी असताना विद्यार्थिनींच्या मोफत प्रवासासाठी शासनाने ५ बस दिल्या. त्यांचा देखभाल व इंधन खर्चही दरवर्षी दिला जातो. मात्र या बसेसचा उपयोग इतर प्रवासी वाहतुकीसाठी तसेच अन्य तालुक्यात केला जातो. हा भ्रष्टाचार नव्हे काय? असा सवाल करीत महामंडळाने या बसेस स्वत:साठी वापराव्यात आणि त्यांचा मोबदला तालुक्याला द्यावा त्यापासून आम्ही विद्यार्थ्यांना सेवा पुरवू असे नासीर काझी यांनी स्पष्ट केले.
जा पण बोलू नका?
मानव विकासच्या तालुका समिती सभेत एस. टी. च्या नियोजनाचा मुद्दा गाजणार हे लक्षात आल्यामुळे वरिष्ठांनी दांडी मारून वाहतूक नियंत्रकांना सभेला पाठविले. मात्र, सभेत उपस्थित झालेल्या मुद्यांची उत्तरे ते देऊ शकत नव्हते. त्यामुळे काझी यांनी ‘तुम्ही सभेला का आलात?’ असा प्रश्न केला. त्यावेळी ‘तुम्ही सभेला जा पण सभागृहात काहीच बोलू नका’ असे वरिष्ठानी आपणास सांगितल्याचे नियंत्रक बोडेकर यांनी स्पष्ट केले.