कमिशन घेणारा उमेदवार कसा?
By Admin | Updated: September 28, 2014 00:15 IST2014-09-28T00:15:39+5:302014-09-28T00:15:39+5:30
नारायण राणे : राजन तेलींवर टीका

कमिशन घेणारा उमेदवार कसा?
सावंतवाडी : पंढरपूर येथून चुकून एक बडवा आमच्याकडे आला होता. पण आता या बडव्याला पुन्हा ट्रान्सफर केले असून कोणाला न आवडणारी व्यक्ती म्हणजे राजन तेली आहे. या मतदारसंघात काँग्रेसची लढत शिवसेनेच्या दीपक केसरकर व राष्ट्रवादीच्या सुरेश दळवी यांच्याशीच असल्याचे सांगत नारायण राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार राजन तेली यांच्यावर जोरदार तोफ डागली. कमिशन घेणारा कधी उमेदवार होऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेते नारायण राणे हे शनिवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार नीलेश राणे, युवा नेते नीतेश राणे, संदेश पारकर, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, दत्ता सामंत, विकास सावंत, संजू परब, सभापती प्रमोद सावंत, उमेदवार बाळा गावडे, डॉ. जयेंद्र परूळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी राणे म्हणाले, राज्यात आम्ही प्रचारात उतरल्यावर सर्वांवर टीका करणार. त्यात राष्ट्रवादीलाही सोडणार नाही. राज्यात सर्वत्र मी प्रचारासाठी फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आमच्या विरोधात लढण्यासाठी एकही लायक उमेदवार नसल्याची टीका त्यांनी केली.
सावंतवाडीत काँग्रेसची लढत शिवसेना व राष्ट्रवादीशी होणार आहे. भाजप कुठेच या स्पर्धेत असणार नाही, असे राणे म्हणाले. भाजपाच्या संस्कृतीत सावंतवाडीत न राहणारे आणि जिल्ह्यात कोणाला न आवडणारे उमेदवार कसे काय चालले, याचा शोध घ्यावा लागेल. तेली हे टक्केवारीचे उमेदवार आहेत.
मायनिंग तसेच अन्य लोकांकडून पैसे काढण्याचे काम हे करतील. पंढरपूरच्या विठोबाकडे यापूर्वी बडवे असायचे, त्यातील एक बडवा सिंधुदुर्गात आला. राजन तेलीमुळे अनेकजण मला भेटण्यास येत नव्हते, ते आज मला मुक्तपणे भेटत आहेत. या तालुक्यात संबंध नसणारी व्यक्ती कशासाठी येते, याचा शोध घ्या. सकाळी एक आणि संध्याकाळी दुसरा पक्ष बदलणारा उमेदवार कधीही आमदार होणार नाही, अशी टीका केली. यापूर्वी सावंतवाडीतील अपयशाला तेलीच जबाबदार असून त्यामुळेच आम्हाला आतापर्यंत शून्य पाहाता आला. आमदार विजय सावंत हे अपक्ष राहिले तरी आमच्यावर त्यांचा परिणाम होणार नाही. आतापर्यत ते बंडखोरी करत आले आहेत. दोन इमारती बांधल्या म्हणजे विकास झाला का, लोकांसाठी काय केले? नाटळ ग्रामपंचायतीत एक सदस्य निवडून न आणू शकलेले काय लढत देणार, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस विकासाचा मुद्दा घेऊन लढणार आहे. भाजपाने देशातील जनतेची फसवणूक केली असून निवडणूकपूर्वी २४ सिलिंडर देणारे आता बारा सिलिंडर देत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)