रत्नागिरी भाट्ये किनाऱ्यावर हॉवरक्राफ्ट!

By Admin | Updated: September 19, 2014 00:30 IST2014-09-19T00:21:39+5:302014-09-19T00:30:01+5:30

आज गोव्याहून कर्नाटककडे प्रयाण करणार

Hovercraft on the coast of Ratnagiri Bhatya! | रत्नागिरी भाट्ये किनाऱ्यावर हॉवरक्राफ्ट!

रत्नागिरी भाट्ये किनाऱ्यावर हॉवरक्राफ्ट!

 रत्नागिरी : भाट्ये येथील पुळणीवर आज (गुरुवार) सकाळी ११.३० वाजता कोस्ट गार्डचे युके बनावटीचे एच-१९६ हे हॉवरक्राफ्ट दाखल झाले आहे. उद्या (शुक्रवार) सकाळी हे हॉवरक्राफ्ट गोव्याकडे व तेथून कर्नाटककडे प्रयाण करणार आहे. सागरी सुरक्षिततेच्या कामात हे अत्याधुनिक हॉवरक्राफ्ट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कोकण किनारपट्टीला याआधीही दोन अत्याधुनिक बनावटीची हॉवरक्राफ्ट देण्यात आली आहेत. गेल्या वर्षभराच्या काळात तीनवेळा ही हॉवरक्राफ्ट विमानाच्या वेगाने सागरलाटांवरून झेपावत रत्नागिरीतील भाट्ये किनाऱ्यावरील पुळणीत धुरळा उडवत विसावली होती. त्याचा आनंद रत्नागिरीकरांनीही मनमुराद लुटला होता. आज आणखी एक हॉवरक्राफ्ट भारतीय कोस्ट गार्डच्या ताफ्यात सामील झाले आहे. त्यामुळे कोस्टगार्ड विभागाच्या हॉवरक्राफ्टची संख्या आता १८ झाल्याची माहिती कोस्टगार्ड विभागाचे कमांडंट एस. एम. सिंग यांनी दिली. आज सकाळी साडेअकरा वाजता हे हॉवरक्राफ्ट भाट्ये किनाऱ्यावर धुरळा उडवतच दाखल झाल्यानंतर भाट्ये पुलावरून ये-जा करणाऱ्या गाड्या जागीच थबकल्या. वाहनांची मोठी गर्दी पुलावर झाली. गाड्या थांबवून लोकांनी हॉवरक्राफ्टचा नजारा जवळून पाहिला. काही क्षणातच त्यावरील कर्मचाऱ्यांनी हॉवरक्राफ्टच्या भोवताली असलेल्या रबरी ट्यूबमधील हवा रिकामी केली. दुपारी २ वाजेपर्यंत हे हॉवरक्राफ्ट पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी भाट्ये पुलावर गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Hovercraft on the coast of Ratnagiri Bhatya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.