रुग्णालयाची बेफिकिरी ; ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

By Admin | Updated: November 26, 2014 00:01 IST2014-11-25T22:31:40+5:302014-11-26T00:01:01+5:30

लोरे येथील नातेवाईकांचा आरोप : शंकर मांजलकर यांना झाला होता सर्पदंश

Hospital aptitude; Death of Gram Panchayat member | रुग्णालयाची बेफिकिरी ; ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

रुग्णालयाची बेफिकिरी ; ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू

वैभववाडी : जिल्हा रुग्णालयाच्या बेफिकिरीमुळे लोरे ग्रामपंचायतीच्या सदस्याला प्राण गमवावा लागला. लोरे मांजलकरवाडी येथील शंकर झिलू मांजलकर यांना सर्पदंश झाल्यामुळे रविवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मांजलकर यांच्यावर वेळेत योग्य उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयात सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल तालुक्यात संताप व्यक्त होत असून संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी होत आहे.
शंकर मांजलकर उसाच्या शेतात काम करीत असताना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाला. तीन ठिकाणी दंश झाल्यामुळे ते शेतातच बेशुद्ध पडले होते. कुटुंबियांनी यासंबंधी वाडीत कल्पना देऊन मांजलकर यांना फोंडा प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर मांजलकर यांना जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे मांजलकर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यावेळी एकही डॉक्टर रविवार असल्यामुळे रुग्णालयात उपलब्ध नव्हते असे मांजलकर यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे तेथील कर्मचारी डॉक्टरांशी दूरध्वनीवर सल्लामसलत करून मांजलकर यांच्यावर उपचार करीत होते. त्यामुळे केवळ फोनवरील सल्ल्याच्या उपचारावर मांजलकर यांना जिल्हा रुग्णालयात रात्र काढावी लागली. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास डॉक्टर आल्यावर मांजलकर यांना एक इंजेक्शन देण्यात आले. मात्र, तोपर्यंत मांजलकर यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यामुळे ९.३० च्या सुमारास मांजलकर यांना गोव्याला नेण्यास सांगितले.
मांजलकर यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार होण्यासाठी गोव्याऐवजी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरनी मांजलकर यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे स्पष्ट केले. तसेच खासगी रुग्णालयातील उपचाराला मांजलकर यांच्याकडून प्रतिसादही मिळत नव्हता. अखेर दुपारी २.३० च्या सुमारास मांजलकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
ग्रामपंचायत सदस्य असलेले मांजलकर मोलमजुरीवर कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना दोन मुलगे, पत्नी, आईवडील असा परिवार आहे. मांजलकर यांचा जिल्हा रुग्णालयाच्या बेफिकिरीमुळे मृत्यू झाल्यामुळे तालुक्यात संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

वैभववाडी तालुक्यातील दुसरी घटना
शंकर मांजलकर यांना जिल्हा रुग्णालयात जी ‘ट्रीटमेंट’ मिळाली अगदी तशीच तीन वर्षांपूर्वी त्यांचीच नातेवाईक असलेल्या कुसूर पिंपळवाडीतील साक्षी कुळये हिच्या बाबतीत आॅक्टोबर २०११ मध्ये घडला होता. जिल्हा रुग्णालयात उपचारास विलंब झाल्याने साक्षीचा बांबुळीतील रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर मांजलकर यांना जिल्हा रुग्णालयाच्या अनागोंदीमुळे जीव गमवावा लागला आहे.


शल्य चिकित्सकांकडून प्रतिसाद नाही
ग्रामपंचायत सदस्य शंकर मांजलकर यांच्या मृत्यूचा ठपका नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयावर ठेवला आहे. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकलेला नाही. त्यामुळे मांजलकर कुटुंंबियांनी जिल्हा रुग्णालयातील रविवारी रात्रीच्या स्थितीबद्दल केलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण मिळू शकले नाही.

Web Title: Hospital aptitude; Death of Gram Panchayat member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.