आशा संघटना पुन्हा आंदोलन करणार
By Admin | Updated: July 23, 2014 21:56 IST2014-07-23T21:36:42+5:302014-07-23T21:56:15+5:30
कोणत्याही मागण्यांची पूर्तता न झाल्याने निर्णय

आशा संघटना पुन्हा आंदोलन करणार
सावंतवाडी : विविध मागण्यांसंदर्भात १ जुलै रोजी आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करुनही कोणत्याही मागणीची पूर्तता झाली नाही. त्यामुळे शासनाने याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सावंतवाडी तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेने तहसीलदार सतीश कदम यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी सचिका पवार, राजश्री नाईक, श्रेया कुडतरकर, अनुष्का गोवेकर, कांचन देऊस्कर, किशोरी बांदेकर, सुधा बांदेकर, हेमांगी गोवेकर, अस्मिता नाईक, शीतल शिरसाट, गायत्री कांडरकर उपस्थित होते.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील आशा व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य शासनाने आगामी निवडणुकांपूर्वी ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आशा व गटप्रवर्तकांना ग्रामीण पातळीवर आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे, आशांना सात हजार, तर गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन सुरू करावे, त्यांच्या कुटुंबियांना मेडिक्लेम लागू करावा, ग्रामपंचायत व आरोग्य खात्याकडून सन्मानाची वागणूक मिळावी, आशांना सर्व औषधांनीयुक्त मेडिकल किट्स व आवश्यक साधने पुरावावीत, राष्ट्रीय आरोग्य अभियान सुकाणू समितीने ४ जानेवारी रोजी केलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी आणि जनतेचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनेही योजना करून निधीत भरघोस वाढ करावी, अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या
आहेत. (वार्ताहर)