होडावडा सरपंचांचे उपोषण
By Admin | Updated: July 9, 2015 21:35 IST2015-07-09T21:35:58+5:302015-07-09T21:35:58+5:30
पाणी योजना वीज जोडणी : पंधरा दिवसांत जोडणार

होडावडा सरपंचांचे उपोषण
वेंगुर्ले : होडावडा नळपाणी योजनेकरिता मंजूर विद्युत ट्रान्स्फॉर्मरसह वीज जोडणी तत्काळ पूर्ण करण्याबाबत वेंगुर्ले वीज मंडळाला निवेदनाद्वारे कळवूनही जोडणी न केल्याने बुधवारी होडावडा सरपंचासहित ग्रामस्थांनी वेंगुर्ले वीज मंडळ कार्यालयासमोर उपोषण केले. मात्र, काँग्रेस तालुकाध्यक्ष मनीष दळवी यांच्या मध्यस्थीने वीज कंपनीचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता सागर हुजरे यांनी पंधरा दिवसांत वीज जोडणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
वेंगुर्ले वीज कंपनी कार्यालयासमोर होडावडा नळपाणी योजनेकरिता मंजूर विद्युत ट्रान्स्फॉर्मरसह विद्युत जोडणी तत्काळ पूर्ण न केल्याने बुधवारी होडावडा सरपंच राजबा सावंत, ग्रामपंचायत सदस्य रूपल परब, राजाराम पावणोजी, ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्ष मनीष दळवी, होडावडा सोसायटी अध्यक्ष दिगंबर दळवी, सदस्य विजय होडावडेकर, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, माजी उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडिस, शहर उपाध्यक्ष प्रशांत आजगावकर, एन.एस.यु.आय. तालुकाध्यक्ष मारुती दोडशानट्टी, युवक विभागीय अध्यक्ष पप्पू परब, सायमन आल्मेडा, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
ही योजना दोन वर्षापूर्वी मंजूर होऊनही वीजजोडणी आजतागायत पूर्ण झालेली नाही.
उपोषण स्थगित
बुधवारी वीज कंपनीचे अधिकारी हुजरे यांनी मंजूर योजनेच्या वर्क आॅर्डर संदर्भातील कागदपत्रे कार्यालयातून गहाळ झाल्याची माहिती देताच, उपोषणकर्त्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर येत्या पंधरा दिवसांत कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर वीज जोडणी करण्याचे आश्वासन हुजरे यांनी दिले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले.